

Gurugram Thar accident
गुरुग्राम: दिल्ली-जयपूर महामार्गावर आज (दि. २७) पहाटे झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणींसह ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. झारसा चौकाजवळ भरधाव वेगाने असलेली थार गाडी दुभाजकाला धडकून पलटी झाली. अपघातामुळे गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
हा भीषण अपघात पहाटे सुमारे ४:३० वाजता घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून गुरुग्रामच्या दिशेने निघालेल्या या काळ्या रंगाच्या थारमध्ये एकूण सहा लोक यामध्ये तीन तरुण आणि तीन तरुणी प्रवास करत होते. अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजकावर आदळली. धडक इतकी जोरात होती की, दोन तरुण आणि दोन तरुणी असे चार जण जागीच ठार झाले. गंभीर जखमी अवस्थेतील एका तरुणीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण गंभीर जखमी असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, अपघातग्रस्त थार महामार्गावरून बाजूला केली आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.