

Maharashtra Rain
मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) २९ सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने म्हटले आहे की, राज्यात ५ ऑक्टोबरपूर्वी नैऋत्य मोसमी पाऊस परतण्याची शक्यता नाही.
दक्षिण विदर्भ आणि मराठवाड्याला लागून असलेल्या प्रदेशांमध्ये काल दुपारपासून पाऊस सुरू आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत अजूनही जोरदार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण राहू शकते. याव्यतिरिक्त, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट प्रदेश, कोल्हापूर घाट प्रदेश, सातारा घाट प्रदेश, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये असाच मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे.
राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना शेतीचे काम हवामान अंदाजाच्या दृष्टीने आखणी करून करावे आणि कापणी केलेल्या पिकांचे पाऊस व वाऱ्यापासून संरक्षण करण्याची व्यवस्था करावी, असा सल्ला दिला आहे. दक्षिण मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागातील धरणांमधील पाणीसाठा वाढणार असून नद्यांना पूर येऊ शकतो, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
या महिन्यात महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यांत सतत पाऊस सुरू आहे. आतापर्यंत राज्यात ५० लाख हेक्टर शेतजमीन आणि उभी पिके नुकसानग्रस्त झाली आहेत. पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य आपत्कालीन व्यवस्थापन निधीतून २२१५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, केंद्राकडे अधिक निधीची मागणी करण्यात आली आहे. विशेषतः मराठवाडा प्रदेशात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे लाखो एकर पीक भूईसपाट झाले आहे.