.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमध्ये मुसळधार पाऊस (Gujarat rains) सुरू असल्याने नद्यांना पूर आला आहे. गेल्या तीन दिवसांत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. पूरग्रस्त भागातून जवळपास १८ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. हवामान खात्याने आज ११ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला असून केंद्राकडून राज्याला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
गुजरात सरकारने दिलेल्या माहितीनुसार, पुरामळे मोरबी, वडोदरा, भरूच, जामनगर, अरावली, पंचमहाल, द्वारका आणि डांग जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला, तर आनंदमध्ये सहा, अहमदाबादमध्ये चार, गांधीनगर, खेडा, महिसागर, दाहोद आणि सुरेंद्रनगर जिल्ह्यात प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मोरबी जिल्ह्यातील धवना गावाजवळ पूल ओलांडताना ट्रॅक्टर-ट्रॉली वाहून गेली, यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. (Gujarat rains)
भारतीय हवामान विभागाने (IMD) आज (दि. २९) गुजरातमधील ११ जिल्ह्यांमध्ये पावसासाठी रेड अलर्ट (Gujarat rains) आणि २२ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. IMD ने कच्छ, द्वारका, जामनगर, मोरबी, सुरेंद्रनगर, जुनागढ, राजकोट, बोताड, गिर सोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्ह्यांसह कच्छ आणि सौराष्ट्र प्रदेशांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय उत्तर, मध्य आणि दक्षिण गुजरातसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वडोदरा येथे पाऊस थांबला असला तरी, विश्वामित्री नदीच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडून वस्त्यांमध्ये प्रवेश केल्याने अनेक भागात पुराचे पाणी साचले आहे.