

Ahmedabad plane crash |
दिल्ली : गुजरातमध्ये झालेल्या भीषण विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दुर्घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन या दुर्घटनेतून आश्चर्यकारकरित्या बचावलेल्या एकमेव व्यक्तीची भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली.
आज सकाळी पंतप्रधान मोदी विशेष विमानाने अहमदाबाद येथे दाखल झाले. तेथून ते थेट विमान कोसळलेल्या दुर्घटनास्थळी पोहोचले. त्यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बचावकार्य, मदतकार्य आणि तपासाची सविस्तर माहिती घेतली.
घटनास्थळाच्या पाहणीनंतर पंतप्रधान मोदी यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. तेथे त्यांनी विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव प्रवाशाची भेट घेतली. डॉक्टरांकडून त्यांनी जखमी व्यक्तीच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली.
अहमदाबादमधील विमान अपघातानंतर मदतकार्य आता थांबले आहे. अपघाताबाबत एअर इंडियाने एक निवेदन जारी केले आहे. एअरलाइनने म्हटले आहे की, अपघाताच्या वेळी विमानात एकूण २४२ प्रवासी होते, त्यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. फक्त एक प्रवासी वाचला आहे, ज्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एअर इंडिया बोईंग ७८७ विमान अपघाताच्या चौकशीत आता यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) देखील सामील होईल. NTSB ने त्यांच्या अधिकृत ट्विटमध्ये माहिती दिली आहे की ते तज्ञांची एक टीम भारतात पाठवत आहे, जी भारताच्या एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) सोबत या अपघाताच्या चौकशीत सहकार्य करेल.
अमेरिकेचे परिवहन सचिव शॉन डफी यांनी भारतातील एअर इंडिया विमान अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "भारतातील अपघातामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. आम्ही अपघाताच्या चौकशीत भारताला मदत करण्यासाठी राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळासोबत काम करत आहोत. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनचे तपासक अपघातस्थळी तैनात आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक डेटा मिळविण्यासाठी आम्ही अतिरिक्त संसाधने पाठवण्यास तयार आहोत. FAA ने तपासाचा भाग म्हणून आवश्यक माहितीची पुनरावलोकन करण्यासाठी बोईंग आणि GE ला आधीच नियुक्त केले आहे. NTSB तपासाचे नेतृत्व करत असल्याने, आम्ही कोणत्याही सुरक्षा शिफारसी लागू करण्यास मागेपुढे पाहणार नाही. आम्ही सुरक्षिततेला प्राधान्य देऊ."
टाटा ग्रुपने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, टाटा ग्रुप अपघातात जखमी झालेल्यांना पूर्ण उपचार देईल आणि त्यांना आवश्यक ती सर्व मदत पुरवेल. तसेच, बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या बांधकामातही मदत करेल, असे टाटा ग्रुपने म्हटले आहे.