

Viral News
आग्रा : "मी तिच्या वडिलांच्या मेहनतीची कमाई हिरावून घेणार नाही," असे म्हणत एका तरूणाने ३१ लाख रूपयांचा हुंडा परत केला. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील अवधेश राणा (वय २६) या तरूणाचे राज्यासह सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. त्याने सामाजिक रूढींना छेद देत केवळ एक रुपया 'शगुन' म्हणून स्वीकारून हुंडा प्रथेविरुद्ध समजाला एक संदेश दिला आहे.
कोरोना काळात वडिलांना गमावलेल्या २४ वर्षीय वधूच्या कुटुंबासाठी हा क्षण अत्यंत भावनिक ठरला. लग्न समारंभात वधूच्या कुटुंबाने कष्टाने जमवलेले ३१ लाख रुपये एका ताटामध्ये ठेवले होते. पण नवरदेव अवधेश राणा याने पैशांसमोर हात जोडले आणि नम्रपणे ते पैसे परत केले. यावेळी तो म्हणाला की, "हा पैसा स्वीकारण्याचा मला कोणताही अधिकार नाही. हे वधूच्या वडिलांनी कष्टाने मिळवलेले आहेत. हुंडा प्रथेवर माझा विश्वास नाही आणि मी हे पैसे स्वीकारू शकत नाही."
नवरदेवाच्या या कृतीने उपस्थितांना सुरुवातीला आश्चर्याचा धक्का बसला, पण नंतर टाळ्यांच्या कडकडाटात अवधेशच्या निर्णयाचे जोरदार कौतुक झाले. त्याच्या कुटुंबीयांनीही त्याला पूर्ण पाठिंबा दिला. वधूच्या कुटुंबाने अवधेश आणि त्याच्या आई-वडिलांसमोर कृतज्ञता व्यक्त केली.
गावकऱ्यांनी सांगितले की, अवधेश राणा याचे हे पाऊल हुंडा मागणाऱ्यांसाठी मोठा धडा आहे. अवधेश आणि अदितीचा विवाह सामाजातील घातक रूढींविरूद्ध एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी समाजात नवा आदर्श घालून दिला आहे."
वधू अदितीची आई सीमा देवी, मूळच्या सहारनपूर येथील रणखंडी येथील रहिवासी आहेत, त्यांनी कोरोनामध्ये त्यांचे पती सुनील सिंह यांना गमावले. तेव्हापासून अदिती आणि तिचा धाकटा भाऊ अनुभव हे त्यांच्या आजोबा सुखपाल सिंह यांच्यासोबत शहाबुद्दीनपूर गावात राहत होते. अदितीने एमएस्सीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
हा विवाह समारंभ आनंदी वातावरणात पार पडला. वधू अदिती सिंह सन्मानाने तिच्या नवीन घरी गेली. अवधेश हा सौंदर्य प्रसाधने विक्रिचा व्यवसाय करतो. त्याने 'टाईम्स ऑफ इंडिया'ला सांगितले की, "२२ नोव्हेंबर रोजी आमच्या लग्नात, माझी पत्नी अदिती सिंगचे कुटुंब हुंडा म्हणून ३१ लाख रुपये देत होते, पण आम्ही हुंडा प्रथेच्या विरोधात असल्याने ते परत केले."