

Yamuna Expressway bus fire
ग्रेटर नोएडा: यमुना एक्सप्रेसवेवर बुधवारी रात्री उशिरा एका स्लीपर बसला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ग्रेटर नोएडाहून आग्राच्या दिशेने जाणारी आणि बिहार पासिंग असलेली 'राज कल्पना ट्रॅव्हल्स'ची (BR32 PA8647) बस दयानतपुर गावाजवळ आली असता अचानक पेट घेतली.
दिल्लीहून महोबाकडे जाणाऱ्या या बसमध्ये घटनेच्या वेळी सुमारे ३५ प्रवासी सवार होते. आग लागल्याचे समजताच बसमध्ये एकच पळापळ आणि घबराट उडाली. प्रसंगावधान राखून चालकाने बस एक्सप्रेसवेच्या कडेला थांबवली, ज्यामुळे अनेक प्रवाशांना खिडक्यांतून बाहेर उड्या मारून आपले प्राण वाचवता आले. मात्र, आग अत्यंत वेगाने पसरल्यामुळे काही प्रवासी आतच अडकून पडले आणि त्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
बस मधून धूर आणि आगीच्या ज्वाळा निघताना पाहून प्रवाशांमध्ये घबराट पसरली. चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवून अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले, तर काहींनी बाहेर उड्या मारून स्वतःची सुटका करून घेतली. आग लागलेली असताना बसमधून फटाके फुटल्यासारखे आवाज येत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच यमुना एक्सप्रेसवेची सुरक्षा टीम आणि पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता पाहता सुरक्षेचा उपाय म्हणून जेवर टोल आणि फलाईडा कट येथे सुमारे २० मिनिटे वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या चार ते ५ गाड्या आणि पाण्याच्या टँकर्सच्या साहाय्याने सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात आले. त्यानंतर एक्सप्रेसवेवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
फटाके असल्याचा संशय
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बसला आग लागली तेव्हा त्यातून सतत फटाके फुटल्यासारखे आवाज येत होते. त्यामुळे बसमध्ये सामानासोबत बेकायदेशीरपणे फटाके नेले जात असावेत आणि त्यामुळेच आग वेगाने पसरली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने जवळच्या कैलास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटे ३:३० वाजता नऊ जणांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी करण्यात आली असून, मृतांमध्ये एका वृद्ध महिलेचा आणि एका दिव्यांग मुलाचाही समावेश आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून बसला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे.