

Toll Tax New Rules
नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने टोल टॅक्सच्या नियमांत बदल केले असून, त्याअंतर्गत आता ७० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. 'एनएचएआय'च्या (NHAI) नवीन नियमानुसार, दोन पदरी राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना टोल टॅक्समध्ये ७० टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच प्रवाशांना आता केवळ ३० टक्के टोल भरावा लागेल.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 'राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, २००८' मध्ये महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत. या नवीन नियमानुसार, ज्या दोन पदरी राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण किंवा त्यापेक्षा अधिक रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे, तिथे वाहनचालकांकडून पूर्ण टोल वसूल केला जाणार नाही. यात ७० टक्क्यांची मोठी कपात करण्यात आली आहे.
सुधारित नियमांनुसार, कामाच्या सुरुवातीच्या तारखेपासून प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रवाशांना टोलच्या केवळ ३० टक्के रक्कम भरावी लागेल. याचाच अर्थ बांधकामादरम्यान प्रवाशांना टोल दरांमध्ये ७० टक्क्यांची थेट सूट मिळेल. विशेष म्हणजे, NHAI दरवर्षी टोल दरांमध्ये ७ ते १० टक्क्यांनी वाढ करते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ही सुधारणा नवीन वर्षापासून लागू करण्यात आली असून सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. हा नियम सध्या सुरू असलेल्या आणि नवीन अशा सर्व प्रकल्पांना लागू होईल जिथे टू-लेन हायवेचे फोर-लेनमध्ये अपग्रेडेशन होत आहे.
नवीन नियमानुसार, जर एखाद्या चौपदरी महामार्गाचे सहा किंवा आठ पदरी रुंदीकरण होत असेल, तर टोल टॅक्समध्ये २५ टक्के सूट दिली जाईल. म्हणजेच प्रवाशांना ७५ टक्के टोल भरावा लागेल. याशिवाय, टोल रस्त्याचा खर्च पूर्ण वसूल झाल्यानंतर केवळ ४० टक्के टॅक्स घेण्याचा नियम आधीपासूनच लागू आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, देशभरात सुमारे २५ ते ३० हजार किलोमीटरचे दोन पदरी महामार्ग चौपदरी केले जाणार आहेत. यासाठी सुमारे १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. अधिकाऱ्याने माहिती दिली की, राष्ट्रीय महामार्गांवर मालवाहतुकीचा वाटा ४० टक्के आहे, जो ८० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. चौपदरी कॉरिडॉर तयार झाल्यामुळे व्यावसायिक वाहनांचा सरासरी वेग ताशी ३०-३५ किमीवरून वाढून ५० किमीपेक्षा जास्त होईल.