

Godhra Train Burning Case : सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने २००२ च्या गोध्रा ट्रेन जाळण्याच्या प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका दोषीला दिलासा दिला. दोषीची प्रकृती लक्षात घेता, सर्वोच्च न्यायालयाने त्याची जन्मठेपेची शिक्षा स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती एम. एम. सुंदेश आणि न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. ही याचिका प्रामुख्याने आरोग्याच्या कारणास्तव दाखल करण्यात आली होती; दोषीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, तो गेल्या १८ वर्षांपासून कारावासात आहे.
सुनावणीदरम्यान, राज्य सरकारच्या वतीने उपस्थित असलेल्या वकील स्वाती घिल्डियाल यांनी सांगितले की, न्यायालयाने दोषीच्या प्रकृतीनुसार दिलासा देण्याचा निर्णय घेतला, तर सरकारला त्यास कोणताही आक्षेप नाही. मात्र, हा दिलासा केवळ वैद्यकीय कारणांपुरताच मर्यादित असावा.
'बार अँड बेंच'च्या वृत्तानुसार, खंडपीठाने आपल्या आदेशात नमूद केले की, याचिकाकर्त्याची विनंती प्रामुख्याने वैद्यकीय कारणांवर आधारित होती. राज्य सरकारच्या वकिलांनी मान्य केले की, दोषीच्या वकिलांनी मांडलेल्या आरोग्याच्या समस्या वस्तुस्थितीला धरून आहेत. या परिस्थितीचा विचार करता, न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव दोषीची शिक्षा स्थगित करण्याचा निर्णय दिला. सुनावणीदरम्यान, राज्य सरकारच्या वकिलांनी या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित केले. त्यांनी स्पष्ट केले की, त्या प्रकरणाच्या गुणवत्तेवर कोणतेही भाष्य करत नाहीत; मात्र, वैद्यकीय कारणास्तव शिक्षा स्थगित करण्यास सरकारचा कोणताही आक्षेप नाही, असे त्यांनी पुन्हा एकदा नमूद केले.
याआधी, २८ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने २००२ च्या गुजरात दंगलीदरम्यान बिल्कीस बानोवर सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सात सदस्यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या दोन व्यक्तींची जन्मठेपेची शिक्षा स्थगित करून त्यांना जामीन मंजूर केला होता. न्यायमूर्ती एम. एम. सुंदेश आणि न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या खंडपीठाने हा निकाल देताना नमूद केले होते की, बिपिन चंद्र जोशी आणि प्रदीप मोर्डिया हे दोषी आधीच १७ वर्षांहून अधिक काळ कारावासात राहिले आहेत.