

Gen-Z honesty viral story
नवी दिल्ली : साधारणपणे १९९७ ते २०१२ या काळात जन्मलेल्यांना 'Gen Z' म्हणून ओळखले जाते. मोबाईल आणि स्वतःच्याच तोऱ्यात पिढी, असे वर्णन करत ज्येष्ठ मंडळी त्यांना फटकारतात; पण थेट वास्तवाला भिडण्याची या पिढीची वृत्ती ही मागील पिढीपेक्षा अधिक आहे. कोणताही आव आणता रोखठोक मते मांडणे हे या पिढीचे वैशिष्ट्य. एकूणच, आपल्या जगण्याबाबत अधिक जागरूक असणारी ही पिढी दांभिकतेला कमी थारा देते... म्हणूनच ब्रेकअप झाल्यानंतर “माझा ब्रेकअप झाला, मला ब्रेक हवाय,” असे बिनधास्तपणे बॉसला सांगण्यासही कमी करत नाही.आता हा सारा तपशील देण्याचे कारण म्हणजे, गुरुग्राममधील एका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO) आपल्या कर्मचाऱ्याच्या सुट्टी अर्जाचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्याने थेटपणे ‘ब्रेकअप’ (Breakup) झाल्यामुळे मानसिक शांततेसाठी सुट्टी हवी असल्याचे सांगितले. सीईओने शेअर केलेला ‘जेन-झी’चा प्रामाणिकपणा तुफान व्हायरल होतोय.
गुरुग्राममधील Knot Dating या कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जसवीर सिंह यांनी ‘एकदम प्रामाणिक रजेचा अर्ज’ असे संबोधत आपल्या एक्स (माजी ट्विटर) खात्यावर हा अनुभव शेअर केला. त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे की, ‘जेन-झी’ पिढी कार्यसंस्कृतीत कशी नवी दिशा आणत आहे, याचे उत्तम उदाहरण आहे.
जसवीर सिंह आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, त्यांच्या टीममधील एका कर्मचाऱ्याने रजेचा ईमेल पाठवला होता. रजेचे कारण पारंपरिक नव्हते. त्या कर्मचाऱ्याने मनमोकळेपणाने लिहिले की,“अलीकडेच माझा ब्रेकअप झाला आहे आणि त्यामुळे मी कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. मला थोडा ब्रेक हवा आहे. आज मी घरून काम करत आहे, त्यामुळे मी 28 तारखेपासून 8 तारखेपर्यंत सुट्टी घ्यायची आहे.”
सिंह यांनी त्या संदेशाचा स्क्रीनशॉट शेअर करत कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. त्यांनी लिहिले की, “ही पिढी मानसिक आरोग्य आणि भावनिक स्थितीबद्दल बोलायला घाबरत नाही. अगदी कामाच्या ठिकाणीही ते मनमोकळेपणाने व्यक्त होतात.”सीईओ जसवीर सिंह यांनी कर्मचाऱ्याच्या रजेचा अर्ज तत्काळ मंजूर केला आणि फक्त दोन शब्दांत उत्तर दिलं — “Leave approved, instantly.”
CEO जसवीर सिंह यांची पोस्ट काही तासांत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. हजारो युजर्सनी प्रतिक्रिया देत 'जेन-झी' कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केलं. अनेकांनी म्हटलं, “कॉर्पोरेट जगतातील बनावट कारणांऐवजी अशा प्रामाणिकतेची हवा निर्माण व्हायला हवी.”तर काहींनी जसवीर सिंह यांच्या या सहानुभूतीपूर्ण प्रतिसादाचेही कौतुक केले. एका युजरने पोस्ट केली की, “बॉस समजूतदार असेल तर मानसिक आरोग्य चांगलेच राहणार.”