

Petrol price impact on inflation
नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दर वाढीमुळे येत्या काही महिन्यांत किरकोळ महागाईचा निर्देशांक १० ते २५ बेसिस पॉईंट्सनी वाढण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढीच्या या परिणामामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेला या आर्थिक वर्षातील महागाईच्या अंदाजाचा पुनर्विचार करावा लागू शकतो, असा इशारा आर्थिक विश्लेषकांनी दिला आहे.
गेल्या काही काळापासून वाढती किंमत रोखून धरलेल्या अनेक कंपन्या आता वाहतूक आणि कच्च्या मालाचा खर्च वाढल्याचे कारण देत आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याची शक्यता आहे. 'ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन'ने दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावरील मालवाहतुकीचे दर २.५ ते ३ टक्क्यांनी वाढू शकतात. BS-VI वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड' च्या किमती ५० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. तसेच टायर, वंगण, टोल टॅक्स आणि इतर गोष्टींचा खर्च वाढल्याने वाहतूकदार आधीच दबावाखाली आहेत.
इंधन दरवाढीचा थेट परिणाम मे महिन्याच्या ग्राहक किंमत निर्देशांकात दिसायला सुरुवात होईल, तर त्याचा पूर्ण फटका जून महिन्यापासून जाणवेल. यामुळे अनेक अर्थतज्ज्ञांनी महागाईचे आपले जुने अंदाज बदलण्यास सुरुवात केली आहे.
आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गौरा सेनगुप्ता यांच्या मते, या दरवाढीमुळे किरकोळ महागाईत थेट १२ बेसिस पॉईंट्सची वाढ होईल. मे महिन्यातील महागाई ३.९% राहण्याचा अंदाज असून, आगामी काही महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत एकूण १०% पर्यंत वाढ होऊ शकते. यामुळे आर्थिक वर्ष २०२७ मध्ये सरासरी महागाई ४.९% वर पोहोचू शकते. इक्रा रेटिंग्सच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांच्या मते, या दरवाढीमुळे वार्षिक सरासरी किरकोळ महागाई २५ बेसिस पॉईंट्सनी वाढेल. त्यांनी मे २०२६ चा महागाईचा अंदाज ४.१% वरून वाढवून ४.३% केला आहे. डीबीएस बँकेच्या वरिष्ठ अर्थतज्ज्ञ राधिका राव यांच्या मते, पेट्रोल-डिझेलच्या किमती ३ ते ५ टक्क्यांनी वाढल्यास महागाईचा निर्देशांक १५ ते २५ बेसिस पॉईंट्सनी वाढेल, शिवाय याचे इतर क्षेत्रांवर दुय्यम परिणामही होतील.
अर्थतज्ज्ञांनी इशारा दिली आहे की, ही चिंतेची बाब केवळ इंधनाच्या थेट दरवाढीपुरती मर्यादित नाही. वाहतूक, लॉजिस्टिक्स, उत्पादित वस्तू आणि सेवा क्षेत्रांच्या माध्यमातून याचे दूरगामी परिणाम सर्वसामान्यांवर होतील. 'इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च'च्या संचालिका मेघा अरोरा यांनी सांगितले की, इंधनासोबतच दुधाच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांवर अतिरिक्त ताण पडणार आहे. पेट्रोल, डिझेल आणि दुधाच्या एकत्रित दरवाढीमुळे महागाईचा निर्देशांक सुमारे ४२ बेसिस पॉईंट्सनी वाढू शकतो, ज्याचा प्रारंभिक परिणाम मे २०२६ मध्ये सुमारे २० बेसिस पॉईंट्सच्या आसपास दिसेल.