

2021 Exit Polls Bengal: पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर समोर आलेल्या नव्या एक्झिट पोल्समुळे देशातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार, असं अनेक सर्व्हेंमध्ये सांगितलं जात आहे. मात्र 2021च्या विधानसभा निवडणुकांमध्येही अशाच प्रकारचे अंदाज व्यक्त करण्यात आले होते आणि प्रत्यक्ष निकाल मात्र पूर्णपणे वेगळे लागले होते.
त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, एक्झिट पोल्स खरंच किती विश्वासार्ह असतात? 2021 मध्ये पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये एक्झिट पोल्स कितपत अचूक ठरले होते, याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
2021 मध्ये भारतीय जनता पक्ष आणि ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार टक्कर होईल, असे बहुतांश एक्झिट पोल्सनी दाखवले होते. काही सर्व्हेंनी तर भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असेही भाकीत केले होते.
मात्र प्रत्यक्ष निकाल लागले तेव्हा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने मोठा विजय मिळवत सत्ता कायम राखली. तृणमूल काँग्रेसला 215 जागा मिळाल्या, तर भाजप केवळ 77 जागांवर समाधान मानावे लागले होते. यामुळे अनेक एक्झिट पोल्सच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
आसाममध्ये मात्र बहुतांश एक्झिट पोल्स बऱ्यापैकी अचूक ठरले. सर्व्हेंमध्ये भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता आणि निकालातही भाजपने सत्ता राखली. हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने चांगली कामगिरी केली होती.
तमिळनाडूमध्ये बहुतांश एक्झिट पोल्सनी द्रविड मुन्नेत्र कळघमच्या विजयाचा अंदाज व्यक्त केला होता. निकालातही DMK ला सत्ता मिळवली. जागांच्या संख्येत थोडाफार फरक होता, मात्र सत्तांतर होणार हे भाकीत खरं ठरलं.
केरळमध्ये 2021 मध्ये डाव्या आघाडीला पुन्हा सत्ता मिळेल, असा अंदाज एक्झिट पोल्सनी व्यक्त केला होता. प्रत्यक्ष निकालातही डाव्या लोकशाही आघाडीने (Left Democratic Front) ने सत्ता कायम राखली.
पुदुच्चेरी मध्ये NDA आघाडी सत्ता मिळवेल, असा एक्झिट पोल्सचा अंदाज होता तोही खरा ठरला होता.
आता 2026 च्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा पश्चिम बंगालकडे देशाचं लक्ष लागलं आहे. अनेक एक्झिट पोल्स भाजपला आघाडीवर दाखवत आहेत. मात्र 2021 चा अनुभव पाहता अंतिम निकाल येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं योग्य नाही.
राजकीय विश्लेषकांच्या मते, एक्झिट पोल्स मतदारांचा कल दाखवतात, पण प्रत्यक्ष मतदानातील बदल, स्थानिक समीकरणं आणि शेवटच्या क्षणी झालेल्या मतदानाचा प्रभाव अनेकदा निकाल बदलू शकतो. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष अधिकृत निकालांकडे लागलं आहे.