

Emmanuel Macron on Rafale deal
नवी दिल्ली : २०२६ मध्ये सुरू असलेल्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीत असलेले फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी भारतासोबत ११४ राफेल विमानांच्या कराराचे समर्थन केले. ते म्हणाले, "राफेल विमानांमुळे भारताची लष्करी ताकद वाढणार असून दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंध अधिक दृढ होतील. अशा परिस्थितीत या करारावर टीका का केली जात आहे, हे मला समजत नाही. या करारामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मागील आठवड्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने (डीएसी) ११४ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. यावर भारत दौर्यावर असणारे मॅक्रॉन म्हणाले की, "व्यावसायिक बाबी या कंपनी (दस्सो एव्हिएशन) आणि तुमचे सरकार यांच्यातील चर्चेचा भाग आहेत. राफेलमुळे केवळ भारताची सुरक्षा व्यवस्थाच बळकट होणार नाही, तर स्थानिकांना रोजगारही मिळणार आहे. भारत आणि फ्रान्समध्ये केवळ धोरणात्मक भागीदारी नसून ती एक 'विशिष्ट जागतिक धोरणात्मक भागीदारी' आहे, जी अद्वितीय आहे."
मॅक्रॉन यांनी स्पष्ट केले की, या प्रकल्पांतर्गत जास्तीत जास्त सुटे भाग भारतात तयार करण्यावर आमचा भर असेल. "ज्याप्रमाणे टाटा-एअरबस करार झाला आहे. त्याच धर्तीवर राफेलसाठी देखील भारतात उत्पादन केले जाईल. तुम्ही आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकता," असेही ते म्हणाले.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत त्यांच्या विधानांवरून होत असलेल्या टीकेला मॅक्रॉन यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले, "माझ्या विधानाचा विपर्यास करून केवळ छोटासा भागच प्रसिद्ध केला गेला. माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पूर्ण विश्वास आहे, पण त्याचा अर्थ एकमेकांचे ऐकणे आणि समानतेचे नाते जपणे असा होतो." मॅक्रॉन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही निशाणा साधला. "अनेकजण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दावा करतात, मात्र प्रत्यक्षात ते पक्षपाती अल्गोरिदम आणि राजकीय हितसंबंधांनी प्रेरित असतात. जेव्हा प्लॅटफॉर्म्स स्वातंत्र्याच्या नावाखाली द्वेषपूर्ण किंवा वर्णद्वेषी मजकूर पसरवण्यास मदत करतात, तेव्हा ते स्वातंत्र्य उरत नाही, तर त्याला 'जंगलराज' म्हणतात," असेही त्यांनी सुनावेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात मुंबईत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांमधील संबंधांना 'विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी'चा दर्जा देण्यात आला आहे. यादरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांत २० हून अधिक सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये भारतात 'हॅमर' क्षेपणास्त्रांची निर्मिती आणि 'H125' हेलिकॉप्टरची असेंब्ली लाईन सुरू करण्याच्या महत्त्वाच्या करारांचा समावेश आहे.