

Delhi blast case : दिल्लीत १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याबाहेर झालेल्या स्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आणखी चार प्रमुख आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात अटक झालेल्यांची एकूण संख्या सहा झाली आहे. पटियाला हाऊस कोर्टाच्या जिल्हा सत्र न्यायाधीशांच्या प्रोडक्शन ऑर्डरवर एनआयएने जम्मू आणि काश्मीरमधून चारही आरोपींना ताब्यात घेतले. चौघांनाही १० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
जम्मू- काश्मीरच्या पुलवामा येथील रहिवासी डॉ. मुजम्मिल शकील गनई, अनंतनाग येथील रहिवासी डॉ. आदिल अहमद राथेर, लखनऊ येथील रहिवासी डॉ. शाहीन सईद आणि शोपियां येथील रहिवासी मुफ्ती इरफान अहमद वागे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या सर्वांनी दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे एनआयएच्या तपासात स्पष्ट झाले आली आहे.
एनआयएने आधीच दोन इतर आरोपींना अटक केली आहे: आमिर रशीद अली, ज्याच्या नावाने स्फोटात वापरलेली कार नोंदणीकृत होती आणि जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश, ज्याने या प्राणघातक हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याला मदत केली.
१० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात १५ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले हे उल्लेखनीय आहे. एनआयएने म्हटले आहे की तपास वेगाने प्रगती करत आहे आणि येत्या काही दिवसांत अधिक खुलासे अपेक्षित आहेत.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या राज्य तपास संस्थेने (SIA) आज (दि. २०) काश्मीर टाईम्स वृत्तपत्राच्या जम्मू कार्यालयावर छापा टाकला. येथे एके रायफल काडतुसे, पिस्तूलच्या गोळ्या आणि हातबॉम्बच्या पिन जप्त केल्या. देशविरोधी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रकाशनाच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.