

मुंबई : लाल किल्ल्याच्या गेट नंबर 1 वर स्फोट झालेला ‘कार बॉम्ब’ होता आणि हा स्फोट घडवणारा डॉक्टर उमर नबी आजवरचा पहिला शू बॉम्बर ठरला. बुटात दडवलेला ट्रिगर दाबून त्याने हा स्फोट घडवला. आय-20 गाडीतून हाती आलेला बूट आणि धातूचा ट्रिगर पोलिसांनी जप्त केला असून, हा स्फोट ट्रायसेटोन ट्रायपरॉक्साईड (टीएटीपी) या रसायनाचा वापर करून घडवण्यात आला असावा या निष्कर्षापर्यंत तपास यंत्रणा पोहोचल्या आहेत.
एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, लाल किल्ला स्फोटासाठी वापरलेल्या आय-20 कारच्या सांगाड्यातून चालकाच्या सीटजवळ एक बूट आढळला. या बुटात एक धातूचा तुकडा अक्षरश: घुसवून बसवलेला होता. तो ट्रिगर असावा. तिथेच जवळ पायाचा घोटाही तुटलेला आढळला. यावरून ही गाडी चालवत स्फोट घडवणारा डॉ. उमर नबी हा शू बॉम्बर असू शकतो आणि गाडी चालवत चालवत लाल किल्ल्याजवळ येताच आपल्या बुटात ठेवलेला ट्रिगर दाबून त्याने हा स्फोट घडवला असावा.
एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेसह लाल किल्ला स्फोटाचा वेगवेगळ्या कोनातून तपास करणाऱ्या सर्व यंत्रणा अक्षरश: भयभीत व्हाव्यात असे या स्फोटाचे तपशील हाती येत आहेत. ते क्रमाने समजून घेतले तर दहशतवादाने आता कोणते वळण घेतले आणि कोणते आव्हान उभे केले हे लक्षात येईल.
कार म्हणजेच बॉम्ब : कारमध्ये सीटच्या खाली, सीटवर किंवा डिकीमध्ये स्फोटके ठेवणे हे नवे नाही. मात्र, अशी स्फोटके कारमध्ये साठवून लाल किल्ल्याजवळील स्फोट घडवण्यात आलेला नाही, तर कारचेच रूपांतर एका बॉम्बमध्ये करण्यात आले होते. याचा अर्थ कारच्या अनेक पार्टस्मध्ये म्हणजे सुट्ट्या भागांमध्ये स्फोटके ठासलेली होती. कारची चॅसी, इंजीनचे भाग, दरवाजे, मडगार्ड आणि बंपर अशा प्रत्येक भागांत स्फोटके भरलेली होती. स्फोट होताच क्षणार्धात हे सर्व भाग बाहेरच्या दिशेने स्फोटकांसह सुसाट निघतात आणि परिसरात मार्गात येईल त्याचा वेध घेतात. त्यामुळेच लाल किल्ल्याजवळील कारबॉम्बचा स्फोट होताच अनेक वाहने पेटली ती या स्फोटक पार्टस्नी वेध घेतल्यामुळेच.
एसव्हीबीआयईडी : सुसाईड व्हेईकल-बॉम्ब इम्प्रुव्हाईज्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाईस या प्रकारचा हा पहिला स्फोट असावा. हा स्फोट रोखणे यंत्रणांना केवळ अशक्य होऊन बसते. शिवाय एखाद्या मानवी बॉम्बने आपल्या शरीराला स्फोटके बांधून घडवल्या जाणाऱ्या स्फोटापेक्षा हा एसव्हीबीआयईडीचा स्फोट अधिक विध्वंसक असतो. कारण, यात कार हाच बॉम्ब असतो आणि कारचे निरनिराळे पार्टस् बॉम्बसारखेच फुटतात.
कार बॉम्बची चार उदाहरणे
पुलवामामध्ये 2019 मध्ये लष्करी तळावर कार बॉम्ब घुसवून घडवलेल्या स्फोटात 40 जवान शहीद झाले.
कोईमतूरमध्ये मारूती कारचा असाच स्फोट घडवण्यात आला. या कारचा चालकही आत्मघातकीच होता.
मोगादिशूमध्ये 2017 मध्ये कार बॉम्बच्या स्फोटात 587 लोक ठार झाले.
नैरोबी, केनया आणि टांझानियातील दार इस्सलाममध्ये अमेरिकन दूतावासासमोर असेच बॉम्ब भरलेले ट्रक उडवले गेले होते.
चौपदरी विध्वंस : हे एसव्हीबीआयईडी या प्रकारच्या स्फोटाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होय.
या स्फोटानंतर निर्माण होणाऱ्या पहिल्या स्फोटक लाटेत संपर्कात येणाऱ्यांचे फुफ्फुस, कान आणि पोट उद्ध्वस्त होते.
दुसऱ्या टप्प्यात स्फोटानंतर सुसाट निघणारे गाडीचे पार्टस् संपर्कात येईल त्याचा अक्षरश: वेध घेतात, छेद करतात. अशा कारची काचदेखील विनाशकारी ठरते.
या स्फोटाचे बळी ठरलेले अत्यंत दूरवर फेकले जातात. अनेकदा एखाद्या भिंतीवर ते आपटले जातात आणि त्यांची जगण्या वाचण्याची शक्यताच संपुष्टात येते.
ज्या कारचा बॉम्ब केलेला असतो त्या कारमधील इंधन जागेवरच वणवा भडकवते आणि त्यातून भाजल्याच्याच्या जखमा जीवघेण्या ठरतात.