

Bihar Murder Case : बिहारमधील प्रसिद्ध व्यावसायिक आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते गोपाळ खेमका यांची शुक्रवारी (दि. ४) रात्री पाटण्यातील त्यांच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. खेमका घरी जात असताना ही घटना घडली. आरोपींनी त्यांच्यावर गोळी झाडून घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला. विशेष म्हणजे, सहा वर्षांपूर्वी त्यांचे पुत्र गुंजन खेमका यांचीही वैशाली येथील औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
"गोपाळ खेमका हे पाटण्यातील एक नामांकित व्यावसायिक होते. एकेकाळी मगध हॉस्पिटलचे मालकही होते. ४ जुलै रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गांधी मैदान दक्षिण परिसरातून व्यावसायिक गोपाळ खेमका यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस रुग्णालय आणि घटनास्थळी पोहोचले. परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. पुढील कारवाई केली जाईल," अशी माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली.
घटनेनंतर कुटुंबीयांनी त्यांना जखमी अवस्थेत पाटण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी गोपाळ खेमका यांना मृत घोषित केले. यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात तीव्र संताप व्यक्त केला. गोपाळ खेमका यांचे धाकटे भाऊ संतोष खेमका यांनी पोलिसांवर मोठा हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत सांगितले की, घटनेनंतर तब्बल दीड तासाने गांधी मैदान पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. पाटण्याच्या शहर पोलीस अधीक्षक (मध्य) यादेखील दोन तासांनंतर घटनास्थळी पोहोचल्या, असा दावा खेमका यांच्या कुटुंबीयांनी केली.
पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव उर्फ राजेश रंजन यांनी काल रात्री घटनास्थळी धाव घेतली. 'X' वरील एका पोस्टमध्ये त्यांनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीका केली आणि "बिहारमध्ये कोणीही सुरक्षित नाही" असे म्हटले. बिहार गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे! नितीशजी, कृपया बिहारला वाचवा," असे पप्पू यावद यांनी म्हटलंे आहे। ते म्हणाले.खेमका यांच्या मुलाची हत्या झाली होती, तेव्हा जर सरकारने "गुन्हेगारांशी हातमिळवणी न करता त्यांच्यावर कठोर कारवाई केली असती, तर आज गोपाळ खेमका यांची हत्या झाली नसती."