

पुढारी ऑनलाईन डेस्क
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि सीपीएम नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचे आज गुरुवारी (दि.८) सकाळी त्यांच्या दक्षिण कोलकाता येथील निवासस्थानी निधन (Buddhadeb Bhattacharjee passes away) झाले. त्यांनी वयाच्या ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ''पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या जाण्याने मला खूप दुःख झाले. त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि चाहत्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही प्रार्थना.'' अशा शब्दांत पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि नंदीग्रामचे भाजप आमदार सुवेंदू अधिकारी यांनी बुद्धदेव भट्टाचार्य यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत होता. यामुळे त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागत होते. गेल्या वर्षी त्यांना न्यूमोनिया झाल्याने लाईफ सपोर्टवर ठेवावे लागले होते. त्यातून ते बरे झाले होते. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी मीरा आणि मुलगा सुचेतन असा परिवार आहे.
भट्टाचार्य हे सीपीएमच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या पॉलिटब्युरोचे माजी सदस्य होते. त्यांनी २००० ते २०११ पर्यंत बंगालचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. ज्योती बसू यांच्यानंतर भट्टाचार्य मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. पण ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवून पश्चिम बंगालमधील ३४ वर्षांची कम्युनिस्ट राजवट संपुष्टात आणली. २०११ च्या विधानसभा निवडणुकीत भट्टाचार्य यांनी सीपीएमचे नेतृत्व केले.
ते कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजचे माजी विद्यार्थी होते. भट्टाचार्य पूर्णवेळ राजकारणात येण्यापूर्वी पेशाने शिक्षक होते. आमदार आणि राज्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर बसू २००० मध्ये पायउतार होण्याआधी त्यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले. तसेच त्यांच्या नेतृत्त्वात २००१ आणि २००६ मध्ये सीपीएमला विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला होता. भट्टाचार्य यांच्या कार्यकाळात डाव्या आघाडी सरकारने ज्योती बसू यांच्या तुलनेत व्यवसायाबाबत तुलनेने खुले धोरण स्वीकारले. हे धोरण आणि औद्योगिकीकरणाशी संबंधित भूसंपादनामुळे २०११ च्या निवडणुकीत डाव्यांच्या जोरदार विजयाचा मार्ग मोकळा झाला.