

नवी दिल्ली: उच्च न्यायपालिकेतील न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि बदल्यांमध्ये गुणवत्ता, विविधता आणि सर्वसमावेशकतेच्या तत्त्वांना हरताळ फासला जात असून, एका विशिष्ट समाजातील उमेदवारांना झुकते माप दिले जात असल्याची गंभीर चिंता माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली आहे.
२७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलेल्या पत्रात गवई यांनी याप्रकरणी तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. या पत्राच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
आपल्या कार्यकाळात कॉलेजियमचा सदस्य आणि प्रमुख म्हणून आपण नेहमीच अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय (ओबीसी), अल्पसंख्याक आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केल्याचे गवई यांनी नमूद केले आहे. मात्र, अलीकडच्या काळात केवळ एका विशिष्ट वर्गाला खूश करण्यासाठी आणि बक्षीस देण्यासाठी शिफारशी केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे.
संसदेत सादर झालेल्या आकडेवारीचा दाखला देताना माजी सरन्यायाधीशांनी म्हटले आहे की, २०१८ पासून नियुक्त झालेल्या ७१५ उच्च न्यायालयीन न्यायाधीशांपैकी केवळ २२ अनुसूचित जाती, १६ अनुसूचित जमाती, ८९ ओबीसी आणि ३७ अल्पसंख्याक समाजातील आहेत.
तसेच, जानेवारी २०२१ ते जानेवारी २०२६ या कालावधीत नियुक्त झालेल्या न्यायाधीशांमध्ये प्रगत समाजाचा वाटा सुमारे ८० टक्के, तर ओबीसींचा वाटा केवळ १४ टक्के राहिला आहे. सर्वोच्च न्यायालयातही लोकसंख्येच्या पाच टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या एका समाजाचे प्रतिनिधित्व अलीकडच्या काळात ४० टक्क्यांहून अधिक झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
कॉलेजियमचे उत्तरदायित्व आणि राष्ट्रपतींची भूमिका
संविधानाच्या कलम १२४(२) नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीचे अधिकार राष्ट्रपतींकडे आहेत. गेल्या काही दशकांत कॉलेजियमच्या शिफारशींना निर्णायक महत्त्व प्राप्त झाले असले, तरी या व्यवस्थेचे उत्तरदायित्व निश्चित झालेले नाही किंवा संविधानाचे रक्षण करण्याची राष्ट्रपतींची जबाबदारी कमी झालेली नाही, असे गवई यांनी स्पष्ट केले.
न्यायपालिकेत समान प्रतिनिधित्वाचे घटनात्मक कर्तव्य पार पाडण्यासाठी सर्व संबंधितांना जाणीव करून देण्याकरिता राष्ट्रपतींनी या विषयात लक्ष घालावे, अशी अपेक्षा त्यांनी पत्राच्या शेवटी व्यक्त केली आहे.
बदल्यांमधील विसंगतीवर प्रश्नचिन्ह
उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांच्या बदल्यांबाबत दोन उदाहरणे देत गवई यांनी कॉलेजियमच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका लहान उच्च न्यायालयात बदली केलेल्या मुख्य न्यायाधीशांना पुन्हा एका मोठ्या उच्च न्यायालयात पाठवण्यात आले, तर दुसरीकडे एका मेहनती मुख्य न्यायाधीशांची लहान न्यायालयात बदली करण्यात आली.
अशा निर्णयांमुळे वंचित घटकांतील आणि प्रामाणिक न्यायाधीशांमध्ये चुकीचा संदेश जाऊन त्यांचे मनोबल खचते, असे मत त्यांनी पत्रात व्यक्त केले आहे.
घटनात्मक प्रतिनिधित्वाची मागणी : उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयातील नियुक्त्या व बदल्यांमध्ये गुणवत्ता आणि सर्वसमावेशकतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पत्राद्वारे केला आहे.
आकडेवारीचा आधार : २०१८ पासून नियुक्त झालेल्या ७१५ उच्च न्यायालयीन न्यायाधीशांपैकी अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाचे प्रमाण अत्यल्प असल्याची आकडेवारी त्यांनी मांडली आहे.
बदल्यांतील विसंगतीवर बोट : काही न्यायाधीशांच्या बदल्या आणि पदोन्नतीबाबत कॉलेजियमच्या निर्णयांमध्ये विसंगती असून, त्यामुळे प्रामाणिक न्यायाधीशांमध्ये नैराश्य येत असल्याचे मत गवई यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रपतींच्या हस्तक्षेपाची विनंती : संविधानाच्या कलम १२४(२) नुसार राष्ट्रपतींनी या प्रकरणाची दखल घेऊन योग्य तो हस्तक्षेप करावा, अशी विनंती गवई यांनी पत्रातून केली आहे.