

Rajasthan Panchayat Election 2026: राजस्थानच्या डीग जिल्ह्यात पंचायत समिती सरपंच निवडणुकीवेळी एक अजब घटना घडली. या घटनेची देशात चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस आणि भाजप हे कट्टर प्रतिस्पर्ध्यांनी एकाच महिलेला आपला उमेदवार म्हणून आपल्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे.
या महिलेने देखील तीन वेगवेगळे अर्ज दाखल करत आपली किती डिमांड आहे हे दाखवून दिलं. विशेष म्हणजे या महिला उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज भरताना वेगवेगळा पेहराव केला त्याची देखील जर्चा सुरू झाली आहे. कधी लाल साडी, कधी पिवळी साडी कधी सलवार सूट घालून या महिलेने तीन अर्ज भरले आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजप विजय झाला. ही महिला कमळाच्या चिन्हावर बिनविरोध निवडून आली.
हे प्रकरण डीग जिल्ह्यातील बृत नगर पंचायत समितीमधील आहे. वॉर्ड नंबर १४ मधून अपक्ष म्हणून निवडून येणाऱ्या बाती गुर्जर यांनी सरपंच पदासाठी काँग्रेस, भाजप, अपक्ष असे तीन अर्ज दाखल केले होते.
बाती गुर्जर यांनी काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लाल साडी घातली होती. तर बीजेपीच्या तिकीटावर अर्ज भरण्यासाठी पिवळी साडी नेसली होती. अपक्ष उमेदवारी अर्ज भरताना गुर्जर यांनी सलवार सूटला प्राधान्य दिलं होतं.
या संपूर्ण घटनाक्रमात नेत्यांची उपस्थिती देखील नजरेत भरण्या सारखी होती. बाती गुर्जर पिवळी साडी नेसून आल्यावर त्यांच्यासोबत अर्ज दाखल करण्यासाठी गृहराज्यमंत्री जवाहर सिंह उपस्थित होते. त्यानंतर काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी त्या लाल साडी नेसून आल्या त्यावेळी काँग्रेसचे माजी आमदार वाजिब अली त्यांच्यासोबत होते.
अर्ज दाखल करण्याच्या क्रमात पहिल्या क्रमांकावर काँग्रेस, दुसऱ्या बीजेपी आणि तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. अर्ज माघा्रीच्या प्रक्रियेवेळी बीजेपीच्या कमळ चिन्हावरील अर्ज मान्य करण्यात आला. त्यानंतर गुर्जर यांना सरपंच म्हणून घोषित करण्यात आलं.
बृज नगर पंचायत समितीच्या रिटर्निंग अधिकारी दुर्गा प्रसाद मीणा यांनी फोनवरून प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी काँग्रेस, भाजप आणि अपक्ष असे तीन वेगवेगळे अर्ज दाखल करण्यात आले होते. नियमानुसार शेवटी जो अर्ज दिला जातो त्या पार्टीच्या चिन्हाला मान्यता दिली जाते. या आधारावर भाजपच्या चिन्हावरील अर्ज स्विकार करण्यात आला. त्यानंतर गुर्जर यांना सरपंच म्हणून घोषित करण्यात आलं. एकाच उमेदवाराने तीन वेगवेगळे अर्ज दाखल केल्यानं राजस्थानच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.