NCP Sharad Pawar: शरद पवारांची राष्ट्रवादी 'इंडिया' आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत? सुप्रिया सुळे बैठकीला अनुपस्थित राहणार

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने काँग्रेसच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेत या विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. तसेच एनसीपी (एसपी) इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे.
Sharad Pawar
Sharad PawarFile Photo
Published on: 
Updated on: 

NCP Sharad Pawar

मुंबई: केंद्र सरकारने या अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पारित करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकत शुक्रवारी (दि. २७) मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधेयकास मंजुरी दिली. या पार्श्वभूमीवर, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेत या विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. तसे संकेत खा. सुप्रिया सुळे यांनी दिलेले असतानाच, आज होणाऱ्या विरोधी इंडिया आघाडीच्या बैठकीलाही त्या अनुपस्थित राहणार आहेत. यामुळे पक्ष या आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे.

शरद पवार राष्ट्रवादीचा खासदारांना 'व्हिप'

सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षातील खासदार वेगळा विचार करू नयेत, म्हणून हा निर्णय घेतला जात आहे. मे महिन्यात टीएमसीच्या २० खासदारांनी आणि जून महिन्यात शिवसेना ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी पक्षांतर केल्यानंतर, तसेच त्याआधी डीएमकेने काँग्रेसची साथ सोडल्यानंतर, शरद पवार राष्ट्रवादीमध्ये भाजपसोबत जाण्यााबाबत चर्चा सुरू झाली होती. गुरुवारी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा केल्यानंतर, शरद पवार राष्ट्रवादीने शुक्रवारी तातडीने आपल्या सर्व लोकसभा सदस्यांसाठी तीन ओळींचा 'व्हिप' जारी केला. या सर्व खासदारांना ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान सभागृहात उपस्थिती सक्तीची केली आहे. पक्षाचे खासदार आणि मुख्य प्रतोद अमोल कोल्हे यांनी हा तीन ओळींचा 'व्हिप' जारी केला. त्यात लिहिले की, सोमवार, ३० नोव्हेंबर ते शुक्रवार, ४ डिसेंबर २०२६ या कालावधीत लोकसभेत अत्यंत महत्त्वाचे कामकाज होणार असल्याने, सर्व सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी या काळात लोकसभेत अनिवार्यपणे उपस्थित राहून पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा.

Sharad Pawar
Delimitation Bill: परिसीमन विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी; 30 नोव्हेंबरला लोकसभेत विधेयक मांडणार, किती जागा वाढणार?

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याची घोषणा!

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचे संकेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी दिलेले असतानाच, या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तशी रीतसर घोषणा शुक्रवारी (दि. २७) करून टाकली. शुक्रवारी संध्याकाळी, ब्रीच कँडी रुग्णालयात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर, डिलिमिटेशन अनिवार्य असल्याचे यापूर्वीच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते. यावर 'माझ्या दैवताची जी भूमिका, तीच माझी,' असे सांगत आ. आव्हाड यांनी या विधेयकावर पक्षाची भूमिका जाहीर केली. दरम्यान, ८ खासदारांना घेऊन सुप्रियाताईंनी हा निर्णय घेतल्याचे आव्हाड म्हणाले. मात्र, त्याचवेळी पक्षाचे खासदार अमर काळे व अमोल कोल्हे यांनी मात्र याबाबत आमच्याशी आजवर चर्चा झाली नसल्याचे सांगत आव्हाड यांच्या भूमिकेला छेद दिला. विधेयकाचा मसुदा वाचल्याशिवाय भूमिका घेतली जाणार नसल्याचेही कोल्हे यांनी म्हटले. दुसरीकडे, यानंतर थोड्याच वेळात खा. सुळे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आ. आव्हाड यांच्यापेक्षा वेगळी भूमिका मांडली. 'आमची भूमिका सभागृहातच कळेल. विधेयकाचा मसुदा वाचल्याशिवाय निर्णय होणार नाही. सर्व एकत्र बसून निर्णय घेऊ.' आव्हाड कदाचित ५० टक्के जागा आणि महिला आरक्षणासंदर्भातील बातम्या पाहून बोलले असतील, अशी सारवासारवही त्यांनी केली.

सुप्रिया सुळे 'इंडिया' आघाडीच्या बैठकीलाही अनुपस्थित राहणार?

पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आज नवी दिल्लीत होणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीलाही अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या वडिलांच्या प्रकृतीचे कारण दिले आहे. शरद पवार यांना गेल्या एका महिन्यात तिसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. मात्र, या बैठकीसाठी पक्ष अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांना पाठवणार आहे. एकीकडे काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना या विधेयकाला विरोध करत असताना, शरद पवार गटाची ही संभाव्य भूमिका महत्त्वाची ठरते; महत्वाचे म्हणजे या पक्षाने एप्रिल महिन्यात या विधेयकाच्या विरोधात मतदान केले होते. मग, गेल्या सहा महिन्यांत असं काय बदललं?

हे तर आधीच ठरलं होतं!

पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने, नाव न सांगण्याची अटीवर सांगितले की, “काही खासदारांनी आधीच स्पष्ट केले होते की, जर पक्ष सरकारमध्ये सामील झाला नाही, तर त्यांचे अस्तित्व टिकवणे कठीण होईल; कारण त्यांना विकासासाठी निधी मिळत नव्हता. निवडणुकीच्या काळात मतदार जाब विचारतील, तेव्हा आपल्या खराब कामगिरीचे समर्थन करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही ठोस उत्तर नसेल.”

Sharad Pawar
Delimitation Bill MK Stalin: DMK च्या मागण्यांनी केंद्र सरकार टेन्शनमध्ये... स्टॅलिन म्हणतात डिलिमिटेशन बीलवर तडजोड नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.