

LPG Booking News: देशात सध्या एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे. मध्यपूर्व आशियातील युद्धामुळं देशातील एलपीजी सिलिंडर बुकिंग करणं म्हणजे एक दिव्य झालं आहे. सामान्य नागरिकांसाठी एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंग ही एक डोकेदुखी झाली असली तरी याच एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगमुळं एका हत्येचा छडा लागला आहे. एका शुल्लक सिलिंडर बुकिंगमुळं चार वर्षे फरार असलेला भारतीय लष्कराचा माजी कॅप्टनला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
खुनाच्या आरोप असलेला संदीप तोमरला मध्य प्रदेशातील पंधुरना जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. सोमवारी त्याला फाजिल्का कोर्टासमोर उभं करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पंजाब पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप तोमर हा २०१३ मध्ये अबोहरमध्ये तैनात होता. त्यावेळी त्यानं त्याची पत्नी श्वेता सिंहची हत्या केली होती.
सुरूवातीला ही आत्महत्या असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र खोलात जाऊन तपास केला असता कट करून हत्या केल्याचा प्रकार उघडकीत आला होता. ट्रायल कोर्टाने २०१४ मध्येच त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं देखील २०२२ मध्ये त्याची शिक्षा कायम ठेवली होती.
संदीप तोमरला या प्रकरणात २०१९ मध्ये जामीन मिळाला होता. मात्र उच्च न्यायालयानं त्याला २०२२ मध्ये दोषी ठरवलं. परंतू संदीप कोर्टाला शरण आला नाही. त्याने आपला ठाव ठिकाणा सतत बदलत राहिला आणि आपली ओळख देखील तो बदलत होता. तो सतत आपलं ठिकाण बदलत असल्यामुळं त्याच्यापर्यंत पोलीस पोहचू शकत नव्हते. २०२४ मध्ये श्वेता सिंहचे वडील राम नरेश यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत संदीप तोमर याच्या अटकेची मागणी केली होती.
यानंतर कोर्टानं पोलिसांना संदीपला पकडण्यासाठी काय काय केलं याची माहिती देण्यास सांगितलं होतं. यानंतर या तपासाची धुरा एका एसआयटीकडे सोपवली. याचे नेतृत्व एसपी रँकचे अधिकारी करत होते.
संदीपला अटक करण्याच्या मोहीमेत एलपीजी सिलिंडर बुकिंग महत्वाचं ठरलं. फाजिल्का पोलिसांनी संदीप तोमरच्या पॅन कार्डशी निगडीत बँक अकाऊंट ट्रेस केलं. या अकाऊंटवरून त्याने एलपीजी सिलिंडर बुक केलं होतं. बँक स्टेटमेंटवरून तो मध्य प्रदेशातील पंधुरनातील एका गँस एजन्सीतून गॅस सिलिंडर रिफ्युल करून घेत होता.
यानंतर पोलिसांनी त्वरित त्या गॅस एजन्सीशी संपर्क केला आणि डिलिव्हरीचा पत्ता मिळवला. ही माहिती पंधुरना एसपींशी शेअर करण्यात आली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी कारवाई करत संदीप तोमरला अटक केली. त्यानंतर त्याला फाजिल्का कोर्टात हजर करण्यात आलं.