

Foreign Tourist Harassment in Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशला 'देवभूमी' म्हणून ओळखले जाते. दरवर्षी लाखो देशी-परदेशी पर्यटक येथील निसर्गसौंदर्य, शांत वातावरण आणि संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी भेट देतात. मात्र, याच हिमाचलमधून आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका परदेशी महिला पर्यटकासोबत सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना 4 जून 2026 रोजी घडल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेल्या CCTV फुटेजमध्ये काही तरुण एका इमारतीबाहेर उभे असल्याचे दिसतात. त्याचवेळी दोन परदेशी पर्यटक त्या ठिकाणाहून पायी जात असतात.
व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे, पर्यटक जवळ येताच त्या तरुणांपैकी एक जण पुढे येतो आणि महिला पर्यटकासोबत अयोग्य वर्तन करतो. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे महिला घाबरलेली दिसते. मात्र, कोणताही वाद न घालता ती आपल्या सहकाऱ्यासोबत तिथून पुढे निघून जाते.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हिमाचलच्या सौंदर्याचा आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी आलेल्या पर्यटकासोबत असा प्रकार घडणे अत्यंत लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
व्हिडिओ शेअर करणाऱ्या सोशल मीडिया पेजनेही या घटनेचा निषेध केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशा घटना केवळ पर्यटकांचा विश्वास डळमळीत करत नाहीत, तर भारताची सुरक्षित पर्यटनस्थळ म्हणून असलेली प्रतिमाही खराब करतात.
व्हायरल व्हिडिओमध्ये एका व्यक्तीचा आवाजही ऐकू येतो. तो या घटनेबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसतो. काही मोजक्या व्यक्तींच्या अशा वर्तनामुळे संपूर्ण हिमाचल प्रदेश आणि तेथील नागरिकांची प्रतिमा मलीन होत असल्याचे तो सांगताना ऐकू येतं.
दरम्यान, सोशल मीडियावर अनेकांनी संबंधित तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच हिमाचल प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन आरोपीचा शोध घ्यावा, अशी मागणीही केली जात आहे.
पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या घटनेमुळे पर्यटनस्थळांवरील सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.