पुढारी ऑनलाईन डेस्क
उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ (Kedarnath) राजमार्गावर भूस्खलन झाल्याने ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे. राज्य आपत्ती निवारण दलाने (एसडीआरएफ) मंगळवारी सकाळी गौरीकुंड आणि सोनप्रयाग दरम्यानच्या केदारनाथ मार्गावर झालेल्या भूस्खलनाच्या ढिगाऱ्यातून आणखी ४ भाविकांचे मृतदेह बाहेर काढले. यामुळे मृतांची संख्या ५ झाली आहे.
केदारनाथ येथून परतणाऱ्या भाविकांचा एक गट सोमवारी संध्याकाळी ७.२५ च्या सुमारास झालेल्या भूस्खलनात अडकला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, एसडीआरएफ (SDRF) आणि एनडीआरएफच्या (NDRF) जवानांनी शोध आणि बचाव मोहीम हाती घेतली. यादरम्यान सोमवारी रात्री मध्य प्रदेशातील एका भाविकाचा मृतदेह सापडला. तर तीन भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, असे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
“खराब हवामान आणि डोंगरावरून सतत दरड कोसळत असल्याने सोमवारी रात्री बचावकार्य थांबवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले. या दरम्यान ढिगाऱ्यातून ३ महिलांसह आणखी चार भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले,” अशी माहिती रुद्रप्रयागचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एनके राजवार यांनी दिली आहे.
मध्य प्रदेशातील घाट जिल्ह्यातील ५० वर्षीय दुर्गाबाई खापर, नेपाळमधील धनवा जिल्ह्यातील वैदेही येथील ७० वर्षीय तितली देवी; मध्य प्रदेशातील धार येथील ५० वर्षीय समनबाई आणि गुजरातमधील सुरत येथील ५२ वर्षीय भरत भाई निरालाल यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
३१ ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात झालेल्या भूस्खलनामुळे गौरीकुंड आणि सोनप्रयाग दरम्यान महामार्गाचा १५० मीटरचा भाग वाहून गेला होता. तेथे पुन्हा भूस्खलन झाल्याने ५ जणांचा मृत्यू झाला आहे.