

पुढारी ऑनलाईन डेस्क
मणिपूरच्या जिरीबाममध्ये (Jiribam) पुन्हा हिंसाचार (Manipur Violence) उफाळला आहे. येथे शनिवारी सकाळी झालेल्या हिंसाचारात ५ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एका व्यक्तीचा झोपेत असताना गोळीबारात मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या गोळीबारात चार सशस्त्र फुटीरतावादी ठार झाले.
मणिपूरमध्ये शनिवारी पुन्हा एकदा हिंसाचार भडकला. जिरीबाम जिल्ह्यात आज सकाळी बंदूकधाऱ्यांनी एका वृद्ध व्यक्तीची झोपेत असताना गोळी मारुन हत्या केली. जिरीबामच्या डोंगरी भागात दोन समुदायात गोळीबार झाला. या धुमश्चक्रीत ४ जण ठार झाले.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, फुटीरवाद्यांनी जिरीबाम जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ५ किमी अंतरावर एका निर्जन ठिकाणी राहणाऱ्या एका व्यक्तीचा घरात प्रवेश केला आणि झोपेत असताना त्याची गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येच्या घटनेनंतर दोन समुदायातील सशस्त्र लोकांमध्ये धुमश्चक्री उडाली. यादरम्यान झालेल्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला.
ही चकमक जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ७ किमी दूर असलेल्या टेकड्यांवर झाला. त्यात चार सशस्त्र फुटीरतावादी ठार झाले. "एका व्यक्तीची त्याच्या घरात झोपेत असताना गोळी मारून हत्या करण्यात आली. तर त्यानंतर झालेल्या गोळीबारात चार सशस्त्र फुटीरतावादी ठार झाले," अशी माहिती अधिकाऱ्यानी दिली.