

पुढारी ऑनलाईन डेस्क : China Viruses : नुकत्याच आलेल्या एका संशोधन अहवालानुसार, चीनमध्ये असलेल्या फर प्राण्यांमध्ये धोकादायक विषाणू आढळून आले आहेत. संशोधनात सुमारे 125 विषाणू ओळखले गेले आहेत जे मानवजातीसाठी अत्यंत धोकादायक आहेत. मानवी लोकसंख्येमध्ये या विषाणूंचा प्रसार होण्याच्या जोखमीबद्दल चिंता वाढली आहे. व्हायरसवर पाळत ठेवण्याची तातडीची गरज असल्याचे विषाणूशास्त्रज्ञ एडवर्ड होम्स यांनी म्हटले आहे.
संशोधनात या पूर्वीच्या अज्ञात 36 विषाणूंचा समावेश आहे, तर 39 विषाणूंची अती धोकादायक म्हणून नोंद केली गेली आहे. या विषाणूंचा संसर्ग झपाट्याने पसरू शकतो असा इशाराही देण्यात आला आहे. नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेले संशोधन 2021 ते 2024 दरम्यान आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान, विषाणूंच्या संसर्गाने मरण पावलेल्या 461 प्राण्यांवर संशोधन करण्यात आले. ज्यात मिंक, कोल्हा, रॅकून कुत्रे, ससे आणि कस्तुरी या प्राण्यांचा समावेश आहे.
संशोधकांना या प्राण्यांमध्ये सात प्रकारचे कोरोनाव्हायरस देखील आढळले आहे. मात्र, त्यापैकी एकचाही SARS-CoV-2, COVID-19 साठी जबाबदार असलेल्या विषाणूशी संबंधीत नाही.
रॅकून कुत्रे आणि मिंक हे सर्वाधिक संभाव्य धोकादायक विषाणू वाहून नेणारे प्राणी आहेत. ज्यामुळे या दोन्ही धोकादायक प्रजाती असल्याचे निरिक्षण संशोधकांनी नोंदवले आहे. अभ्यासानुसार, या प्रजातींमध्ये संसर्ग झालयास त्याचा सर्वात उच्च धोका मानवजातीला आहे.
ईशान्येकडील चिनी प्रांत, ज्यामध्ये अनेक फर फार्म आहेत, विषाणूचे उच्च प्रमाण असलेले विशेषतः उच्च-जोखीम क्षेत्र म्हणून ओळखले गेले. वन्यजीव व्यापार आणि विषाणूची उत्पत्ती अभ्यासाचे निष्कर्ष वन्यजीव व्यापाराशी संबंधित विषाणू प्रसाराच्या व्यापक समस्येकडे लक्ष वेधतात. बऱ्याच शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की कोविड-19 साथीचा रोग वन्यजीव व्यापारातून उद्भवला आहे, वटवाघुळ हा विषाणूचा संभाव्य स्रोत आहे.