

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'थोडी सी जो पी ले है, चोरी तो नही की है', म्हणत बाटल्यांच्या बाटल्या दारु रिचवणारे आपल्याकडे काही कमी नाहीत. आपल्याकडे दारु पिण्यासाठी फक्त निमित्तच पाहिजे असते. अनेक वेळा अनेक पार्ट्या, समारंभ यामध्ये दारुवर किती पैसे उडवले जातात हे देखिल पाहतो. शिवाय आपल्याकडे ३१ डिसेंबर निमित्त किती दारु देशभरात रिचवली गेली याच्या चुरस बातम्या वाचत असतो ऐकत असतो. दारु पिऊन रस्त्याकडेला पडलेले महाभाग देखिल कमी नाहीत. इतकं असून सुद्धा एका सर्वे (Family Health Survey) नुसार भारतात चक्क दारु पिणाऱ्यांमध्ये घट नोंदवल्याचे समोर आले आहे. पिणाऱ्यांसाठी ही बातमी काहीशी निराशाजनक असली तरी एकूण समाजासाठी मात्र फारच आशादायी आणि सकारात्मक अशी बाब आहे.
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या (National Family Health Survey) (NFHS-5) ताज्या अहवालानुसार मागील १५ वर्षांच्या काळात दारु सेवन करणाऱ्या भारतीयांमध्ये घट झाल्याचे आढळून आली आहे. यामध्ये पुरुषांची टक्केवारी ३२ वरुन १८.७ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. तर याच काळात दारु पिणाऱ्या महिलांच्या टक्केवारीमध्ये २.२ वरु १.३ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे निदर्शनास आले आहे.
देशात दारुचे किती सेवण केले जाते याची पाहणी करण्यासाठी नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेने (Family Health Survey) २८ राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशामधील ७०७ जिल्ह्यातील तब्बल ६.३७ लाखांच्या कुटुंबाचा सर्वे केला. या सर्वेनुसार तब्बल ७ लाख २४ ११५ महिला आणि १ लाख १ हजार ८३९ पुरुषांपर्यंत प्रत्यक्ष पोहचून माहिती घेण्यात आली आहे.
या सर्व्हेच्या माहितीनुसार (NFHS-5) अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये वय वर्षे १५ किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांमध्ये दारु पिण्याचे प्रमाण अधिक आहे. अरुणाचलमध्ये हे प्रमाण २४ टक्के तर सिक्कीममध्ये १६ टक्के इतके आहे. तर पुरुषांचा विचार केला तर अरुणाचलमध्ये आणि त्याच्या खालोखाल तेलंगणामधील पुरुष सर्वाधिक दारु पितात. त्यामध्ये अरुणाचालमध्ये ५३ टक्के तर तेलंगणामध्ये ४३ टक्के पुरुष दारु पितात. तर पुरुषांमध्ये लक्षद्वीपमध्ये सर्वाधिक कमी दारु पिले जाते तेथे फक्त ०.४ टक्के इतकेच पुरुष दारु पितात.
बिहारमध्ये दारु बंदी आहे तरी देखिल नितीश कुमार यांच्या राज्यात देखिल दारु पिण्याचे प्रमाण अधिक आहे. त्या खालोखाल उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र यांचा क्रमांक लागतो.
बिहारमध्ये १५ वर्षांवरील १५.५ टक्के लोक दारु पितात. बिहारच्या ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा अधिक दारुचे सेवण केले जाते. बिहारच्या ग्रामीण भागात १५.८ टक्के तर शहरी भागात १४ टक्के पुरुष दारु पितात. तर महिलांचा विचार केला तर ग्रामीण भागात ०.४ टक्के आणि शहरी भागात ०.५ टक्के महिला दारुचे सेवण करतात.
यासह झारखंडमध्ये ३५ टक्के पुरुष आणि ६.१ टक्के महिला दारुचे सेवण करतात. छत्तीसगडमध्ये ३४.८ टक्के पुरुष आणि ५ टक्के महिला दारु पितात. जम्मू काश्मीर मध्ये सर्वात कमी दारुचे सेवण केले जाते. यामध्ये पुरुष ८.८ टक्के तर ०.२ टक्के महिला दारु पितात. महाराष्ट्राचा विचार केला तर हेच प्रमाण पुरुषांमध्ये १३.९ टक्के आणि महिलांच्यामध्ये ०.४ टक्के इतके आहे.