Heatwave Deaths: 45°C तापमान आणि एका दिवसात 3,400 मृत्यू; भारतासाठी धोक्याची घंटा, अभ्यासातून धक्कादायक वास्तव समोर

India Heatwave Deaths: भारतातील तीव्र उष्णतेमुळे एका दिवसात सुमारे 3,400 मृत्यू होऊ शकतात, असा धक्कादायक दावा नव्या अभ्यासात करण्यात आला आहे.
India Heatwave Deaths
India Heatwave DeathsPudhari
Published on
Updated on

India Heatwave Deaths: यंदाच्या उन्हाळ्यात देशातील अनेक भागांमध्ये तापमानाने 45 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट नागरिकांना अक्षरशः भाजून काढत आहे. उष्णतेची लाट हे गंभीर सार्वजनिक आरोग्य संकट बनत चालल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे.

या अभ्यासानुसार, देशभरात एक दिवस तीव्र उष्णतेची परिस्थिती निर्माण झाल्यास तब्बल 3,400 अतिरिक्त मृत्यू होऊ शकतात. जर उष्णतेची लाट सलग पाच दिवस राहिली, तर मृतांचा आकडा जवळपास 30 हजारांपर्यंत पोहोचू शकतो. संशोधकांनी देशातील 10 शहरांमधील आधीच्या अभ्यासांचा आधार घेत संपूर्ण भारतातील जिल्ह्यांवर हे विश्लेषण केले आहे. यामुळे उष्णतेचा परिणाम आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारताला उन्हाळ्याची सवय असली, तरी गेल्या काही वर्षांत उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र झाल्या आहेत. 2024 मध्ये राजस्थानमध्ये तापमान 50.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. यंदाही उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील अनेक भागांमध्ये विक्रमी उष्णतेची नोंद झाली आहे.

उष्णतेचा आणखी एक धोकादायक पैलू म्हणजे वाढत्या उष्ण रात्री. दिवसाची तीव्र उष्णता संपल्यानंतर रात्री काहीसा दिलासा मिळायचा, पण आता शहरांमधील काँक्रीटचे जंगल आणि वाढते शहरीकरण यामुळे रात्रीही तापमान जास्तच राहते. त्यामुळे शरीराला विश्रांती मिळत नाही आणि आरोग्याच्या समस्या वाढतात.

या उष्णतेचा सर्वाधिक फटका शेतकरी, बांधकाम मजूर, रस्त्यावर काम करणारे कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांना बसतो. दिवसभर उन्हात काम करणाऱ्या या घटकांना उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक साधने किंवा सुविधा उपलब्ध नसतात.

विशेष म्हणजे उष्णतेमुळे होणारे अनेक मृत्यू अधिकृत आकडेवारीत दिसूनच येत नाहीत. अनेक प्रकरणांमध्ये मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका, श्वसनाचे विकार किंवा इतर आजार असे नोंदवले जाते. त्यामुळे प्रत्यक्षात उष्णतेमुळे किती लोकांचा मृत्यू होतो, याचे अचूक चित्र समोर येत नाही.

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथील संशोधक पियुष नारंग आणि अशोक गाडगीळ यांनी केलेल्या अभ्यासात हीच उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांच्या मते, सादर केलेले आकडे हे किमान अंदाज आहेत. ग्रामीण भागात संरक्षणाची साधने कमी असल्याने प्रत्यक्ष परिणाम यापेक्षाही गंभीर असू शकतात.

अभ्यासात उत्तर प्रदेश सर्वाधिक धोकादायक स्थितीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पाच दिवसांच्या उष्णतेच्या लाटेदरम्यान या राज्यात 8 हजारांहून अधिक अतिरिक्त मृत्यू होऊ शकतात. तर अहमदाबाद, जयपूर आणि सुरतसारख्या शहरांतील काही जिल्ह्यांमध्ये एका दिवसात 250 हून अधिक अतिरिक्त मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

India Heatwave Deaths
Economic Growth India | आव्हानात्मक स्थितीतही उद्योगांची कामगिरी चांगली

संशोधकांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि कमी GDP असलेल्या राज्यांवर उष्णतेचा परिणाम अधिक गंभीर होतो. कारण अशा भागांमध्ये आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन यंत्रणा तुलनेने मर्यादित असतात.

हवामान बदलामुळे भविष्यात उष्णतेच्या लाटा आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर पूर्वसूचना यंत्रणा, उष्णतेच्या काळात आरोग्य सेवा आणि जोखमीच्या भागांसाठी विशेष उपाययोजना राबवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

India Heatwave Deaths
Tamil Nadu CM Vijay | "प्रत्येक गोष्टीत 'ब्लॅक अँड व्हाईट' ... : कपड्यांवरुन होणार्‍या टीकेवर CM विजय नेमकं काय म्‍हणाले?

आजवर उष्णतेकडे केवळ उन्हाळ्याचा त्रास म्हणून पाहिले जात होते. मात्र हा अभ्यास सांगतो की तीव्र उष्णता आता सार्वजनिक आरोग्यासमोरील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक बनत आहे. त्यामुळे पुढील उष्णतेची लाट येण्यापूर्वीच सरकार, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी सज्ज राहण्याची वेळ आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news