

पुणे: शहराचे कमाल तापमान 40 वरून 36 अंशांवर खाली आले असले, तरी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे तापमान तब्बल 58 अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे शहराच्या एकूण उष्म्यात वाढ होत असून, असह्य उकाडा जाणवत आहे. सिमेंटचे रस्ते, काचेच्या इमारती यामुळे उष्णता वर जात नसल्याने शहर उष्णतेचे बेट बनत चालले आहे.
शहरातील भारतीय कला प्रसारणी महाविद्यालयाच्या प्राध्यापक प्रज्ञा पत्की यांनी हे संशोधन केले आहे. त्या स्थापत्यशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. त्यांनी शहराच्या हवेचे सरासरी तापमान आणि सिमेंटच्या रस्त्याचे तापमान मोजले, तेव्हा हवेचे तापमान 38 तर सिमेंटच्या रस्त्याचे तापमान चक्क 58 अंश इतके नोंदले गेले. त्यामुळे शहराचे तापमान इतर शहरांच्या तुलनेत कमी असूनही इतका उकाडा का निर्माण होतोय याचे कारण समजले.
रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाखाली तापमान 35 अंश : प्रा. पत्की यांनी शहरातील डीपी रस्त्यावरचे तापमान मे महिन्याच्या दुपारी 1 वाजता मोजले ते चक्क 58 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. त्यांच्या म्हणण्यानुसार शहराच्या हवेचे सरासरी तापमान 38 ते 40 अंशांवर असले तरीही सिमेंट रस्त्याचे तापमान 58 आहे. सूर्य मावळला तरी सिमेंटचे रस्ते तापलेले असतात हळूवार थंड होतात. रस्त्यांची ही उष्णता लवकर वर जात नाही. त्यामुळे शहर हे उष्णतेचे बेट झाले आहे. सिमेंटच्या रस्त्यासह झाडाखालचे तापमान मोजले ते 35 अंश मोजले गेले.
सिमेंटचे रस्ते इतके तापण्याचे कारण काय?
पुण्यात सिमेंटचे रस्ते, उड्डाणपूल यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळ ‘अर्बन हिट आईसलॅन्ड’ (उष्णतेचे बेट) हा इफेक्ट तयार होतो.
सिमेंटचे रस्ते दिवसभर मोठ्या प्रमाणावर सूर्याकडून येणारी उष्णता शोषून घेतात. विशेषतः मे महिन्यात दुपारी सूर्यकिरणे लंबकोनात जमिनीवर येतात. त्यामुळे रस्ते वेगाने तापतात.
सिमेंटमध्ये उष्णता साठवून ठेवण्याची क्षमता (थर्मल मास) जास्त असते. त्यामुळे ते उशिरा तापून उशिरा थंड होतात. त्यामुळे रात्रीचा उष्मा जास्त जाणवतो.
डांबरी रस्तेही तापतात, पण त्याचा थर कमी असल्याने उष्णता जास्त खोलवर जात नाही. त्या तुलनेत सिमेंटचे थर जास्त जाड आणि घनता जास्त असल्याने उष्णता खोलवर जाते.
शहरामध्ये काँक्रीटचे रस्ते, उड्डाणपूल यामुळे उष्णतेचा हीट झराच तयार होतो. झाडांची, सावलीची कमतरता, वाहनांमधून बाहेर टाकली जाणारी उष्णता, धूलिकण यामुळेदेखील उष्णता वाढते.
शोधनिबंधात आहे काय?
आसपासच्या भागांच्या तुलनेत महानगरीय प्रदेशांमधील पृष्ठभागाच्या वाढलेल्या तापमानाला ‘अर्बन हीट आयलंड’ (यूएचआय) असे म्हणतात.
पुण्यातील रस्त्यांवरील ‘यूएचआय’चा प्रभाव घटक आणि तापमान यांच्यातील संबंध शोधणे हा या अभ्यासाचा उद्देश आहे.
अनुभवजन्य मोजमापांद्वारे बाहेरील औष्णिक संख्यात्मक मूल्यांकन करणे, हे उद्दिष्टांमध्ये समाविष्ट आहे. उन्हाळ्यात उच्चसौर किरणोत्सर्ग, मान्सूनमध्ये आर्द्रता, पाऊस, आणि हिवाळ्यात कमी हवेचे तापमान लक्षात घेता, भारतातील तिन्ही ऋतूंमध्ये तापमानात बदल दिसून येतील.
यूएचआय प्रभावावर परिणाम करणारे घटक समजून घेणे आणि तिन्ही ऋतूंमधील तापमानाचे तुलनात्मक विश्लेषण करणे ही या अभ्यासाची उद्दिष्टे आहेत.
मी या विषयावर सन 2011 पासून अभ्यास करीत आहे. हा माझा संशोधनाचा विषय आहे. शहरातला उष्मा वाढण्यास सिमेंटच्या रस्त्यांचे तापमान हेच एकमेव कारण नाही. अनेक कारणांपैकी ते एक प्रमुख कारण आहे.
प्रा. प्रज्ञा पत्की, पुणे