

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अमेरिका-इराण युद्धामुळे इंधनाच्या किमतीत झालेली वाढ व कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने वाढलेला उत्पादन खर्च, त्यामुळे उद्योग घटकांचा खालावलेला आत्मविश्वास अशा आव्हानात्मक स्थितीतही उद्योग क्षेत्राने चांगली कामगिरी केली आहे. मे महिन्यातील उत्पादन क्षेत्राचा पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स (पीएमआय) एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात 54.7 वरून 55 टक्क्यांवर गेला आहे.
एका सर्वेक्षणानुसार, जवळपास चार वर्षांतील सर्वाधिक तीव्र खर्चाचा दबाव असताना आणि व्यावसायिक आशावाद फेब्रुवारीनंतरच्या नीचांकी पातळीवर घसरला असतानाही टिकून राहिलेल्या मागणीमुळे भारताच्या उत्पादन क्षेत्राने मे महिन्यात तीन महिन्यांतील सर्वांत जलद गतीने विस्तार केला. एस अँड पी ग्लोबलने केलेल्या पीएमआय अहवालातून ही माहितीसमोर आली आहे. पीएमआय 50 अंकांहून अधिक असल्यास उत्पादन क्षेत्राची स्थिती चांगली मानली जाते.
सिव्हिल इंजिनिअरिंग प्रकल्प, स्पर्धात्मक दर आणि अनुकूल मागणीच्या परिस्थितीमुळे मागणीचा एक प्रमुख निर्देशक असलेल्या नवीन ऑर्डर्समध्ये फेब्रुवारीनंतरची सर्वांत जलद वाढ झाली. देशांतर्गत मागणी हे वाढीचे मुख्य इंजिन होते. निर्यातीच्या मागणीमध्ये गेल्या तीन महिन्यांतील सर्वांत गतीने वाढ झाली आहे. मध्यम आणि भांडवली वस्तूंच्या उत्पादनात आघाडी घेत कारखान्यांचे उत्पादन गेल्या तीन महिन्यांतील सर्वांत जलद गतीने वाढले. परंतु ग्राहककेंद्रित वस्तूंची उत्पादनवाढ घटल्याचे दिसून आले. नोकरीनिर्मितीचा वेग एप्रिलच्या तुलनेत मंदावला आहे.
महागाई वाढली
ऊर्जा, इंधन, कच्चा माल आणि वाहतुकीवरील वाढीव खर्चामुळे कच्च्या मालाच्या किमतीतील महागाई (एप्रिल वगळता) अंदाजे चार वर्षांतील दुसर्या क्रमांकाची सर्वाधिक होती. मध्य पूर्वेतील युद्धामुळे इंधनदरात झालेली वाढ हे त्यामागील एक कारण आहे.
मे महिन्यात 1.94 लाख कोटी जीएसटी जमा
एप्रिल महिन्यात विक्रमी 2.42 लाख कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) जमा झाल्यानंतर मे महिन्यात त्यात 1.94 लाख कोटी रुपयांपर्यंत घट झाली आहे. मात्र, मे 2025 च्या तुलनेत जीएसटी 3.2 टक्क्यांनी अधिक आहे. गतवर्षी याच कालावधीत जीएसटीपोटी 1.88 लाख रुपये जमा झाले होते. निव्वळ जीएसटीचे संकलन 3.3 टक्क्यांनी वाढून 1.67 लाख रुपये झाले आहे.