PM Modi Bengaluru Visit
बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज (दि. १० मे) कर्नाटक दौऱ्यानिमित्त कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात असतानाच, बंगळुरूच्या बाहेरील भागात स्फोटके सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी पंतप्रधानांच्या कार्यक्रमापूर्वी केन्गेरी-कनकापुरा रस्त्यावरील कागलीपुराजवळील एका आश्रमाबाहेर दोन जिलेटिनच्या कांड्या (Gelatin sticks) सापडल्या. हे ठिकाण मुख्य कार्यक्रम स्थळापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर आहे. पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी नियमित तपासणी सुरू असताना फूटपाथच्या कडेला हे स्फोटक साहित्य आढळून आले.
स्फोटके सापडल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने परिसराची नाकेबंदी केली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) तसेच फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली.
या प्रकरणी पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे की, "रविवारी सकाळी पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी केलेल्या तपासणीत फूटपाथवर दोन जिलेटिन कांड्या सापडल्या. या घटनेचा सखोल तपास सुरू असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे." ही स्फोटके तेथे कशी आली आणि यामागे काही मोठा कट होता का, याचा शोध अधिकारी घेत आहेत. या भागात सुरू असलेल्या खाणकामासाठी ही स्फोटके आणली होती की ती मुद्दाम पेरली होती, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरूच्या बाहेरील भागात असलेल्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग' (Art of Living) इंटरनॅशनल सेंटरला भेट दिली. संस्थेच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत एका भव्य ध्यानगृहाचे उद्घाटन केले. दरम्यान, पंतप्रधानांच्या या दौऱ्यासाठी संपूर्ण परिसरात बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था आणि कडक पाळत ठेवण्यात आली होती. स्फोटके सापडल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत अधिक वाढ करण्यात आली आहे.