

Former PM Inder Kumar Gujral son Naresh Gujral cyber fraud
नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे चिरंजीव आणि राज्यसभेचे माजी खासदार नरेश गुजराल यांना सायबर चोरट्यांनी तब्बल ७.८ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भामट्यांनी गुजराल यांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करून एका मेसेजिंग ॲपवर बनावट अकाऊंट तयार केले. तसेच त्यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्याचा फोन हॅक करून दिशाभूल करत कोट्यवधी रुपये लांबवले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने तत्परता दाखवत चोरीला गेलेल्या रक्कमेपैकी ४ कोटी रुपये गोठवले आहेत.
हा संपूर्ण प्रकार १२ ते १६ जून दरम्यान घडला. सायबर गुन्हेगारांनी आधी नरेश गुजराल यांच्या गारमेंट कंपनीच्या एका कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर एक संशयास्पद मालवेअर फाईल पाठवून त्याचा फोन हॅक केला. फोनचा ताबा मिळवल्यानंतर चोरट्यांनी अत्यंत हुशारीने कर्मचाऱ्याच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्टमधून गुजराल यांचा नंबर बदलून स्वतःचा नंबर सेव्ह केला; मात्र नाव आणि डिस्प्ले पिक्चर गुजराल यांचाच ठेवला.
त्यानंतर, व्यवसायासाठी तातडीची गरज असल्याचे भासवून चोरट्यांनी या बनावट नंबरवरून आरटीजीएसद्वारे पैसे ट्रान्सफर करण्याचे मेसेज कर्मचाऱ्याला पाठवले. स्वतः मालकाचाच मेसेज असल्याचा विश्वास बसल्याने कर्मचाऱ्याने ७.८ कोटी रुपये वेगवेगळ्या ४ खात्यांमध्ये ट्रान्सफर केले.
हा व्यवहार नियमित व्यावसायिक प्रक्रियेचा भाग वाटल्याने सुरुवातीला कोणालाही संशय आला नाही. दरम्यान, एवढी मोठी रक्कम ट्रान्सफर होत असल्याने बँकेने धोक्याचा इशारा देत कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांकडे मंजुरी मागितली. परंतु, हे आदेश नरेश गुजराल यांनीच दिले असावेत, या गृहीतकावर सीएफओ यांनीही या व्यवहाराला मंजुरी दिली.
१६ जून रोजी कंपनीच्या एका अधिकाऱ्याला या व्यवहारांबाबत संशय आल्याने, त्यांनी खात्री करण्यासाठी गुजराल यांच्या मुलीशी संपर्क साधला. तिने तातडीने वडिलांकडे चौकशी केली असता, त्यांनी असे कोणतेही आदेश दिले नसल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुजराल कुटुंबाने तातडीने दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली.
"माझ्या गैरहजेरीत सीएफओ दुर्दैवाने या फसवणुकीचे बळी ठरले. मात्र, दिल्ली पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अत्यंत वेगाने कारवाई करत जवळपास ७० टक्के रक्कम रिकव्हर केली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. उर्वरित रक्कमही लवकरच परत मिळेल, अशी आशा आहे."
नरेश गुजराल, माजी खासदार
दिल्ली पोलिसांच्या 'सायबर क्राईम' शाखेचे पोलीस उपायुक्त विनीत कुमार यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. "कोणत्याही व्यक्तीने मेसेजवर पैशांची मागणी केल्यास किंवा गोपनीय माहिती मागितल्यास, केवळ मेसेज किंवा डीपीवर विश्वास न ठेवता संबंधित व्यक्तीला थेट फोन करून खात्री करून घ्यावी," असे आवाहन त्यांनी केले आहे.