

Toxic Corporate Work Culture: कॉर्पोरेटमध्ये कामाचा ताण एवढा वाढला आहे की कर्मचारी हा माणूस आहे, त्यालाही भावना आणि दुःख आहे, हेच अनेकदा विसरलं जातं. अशाच एका कर्मचाऱ्याची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
हा कर्मचारी एका खासगी कंपनीत गेल्या दोन वर्षांपासून काम करत आहे. अचानक रात्री त्याला आजोबांच्या निधनाची दुःखद बातमी मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाणं शक्यच नव्हतं. म्हणून त्याने मॅनेजरला WhatsApp वर शांतपणे मेसेज पाठवला, “सर, माझे आजोबा गेले. आज ऑफिसला येऊ शकणार नाही. रजा हवी आहे.”
अशा मेसेजनंतर शोक व्यक्त करणारे, वेळ घे असं सांगणारे रिप्लाय येण्याची अपेक्षा असते. परंतु त्याच्या बॉसने दिलेलं उत्तर वाचून संताप येईल. बॉस म्हणाला, “हे ऐकून वाईट वाटलं. आज रजा घे. पण आज क्लायंट्स ऑनबोर्ड होणार आहेत. तू इंडक्शन कॉलवर राहा आणि WhatsApp वर अॅक्टिव्ह राहून डिझाइनर्सशी संपर्क ठेवलात तर बरं होईल.”
‘दुःखातही काम कर’ असा आदेश देणाऱ्या या उत्तराने तो कर्मचारी हादरला. त्याने संपूर्ण घटना Reddit वर शेअर केली आणि हजारो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे, “काम एवढं महत्त्वाचं आहे का की माणसाची किंमतच राहू नये?”
त्या पोस्टखाली अनेक कर्मचाऱ्यांनी स्वतःवर ओढवलेल्या अशाच कटू प्रसंगांची कहाणी सांगितली. एका मुलीने लिहिले की वडिलांच्या मृत्यूनंतरही तिच्या बॉसने फक्त तीन दिवसांची रजा दिली आणि चौथ्या दिवशी ऑफिसला हजर राहण्याचा आदेश दिला.
एका युजरने सांगितले की पत्नीचा गर्भपात झाल्यानंतरही दुसऱ्याच दिवशी मिटिंग अटेंड करण्यास भाग पाडले गेले. तर दुसऱ्याने सांगितले की, आई हॉस्पिटलमध्ये भरती असतानाही “घरून काम करा आणि प्रत्येक तासाला अपडेट द्या” असा आदेश देण्यात आला.
काहीजण म्हणाले की कंपन्या खर्च वाचवण्यासाठी नवीन कर्मचारी घेत नाहीत. आधीच असलेल्या लोकांवर प्रचंड कामाचा बोजा टाकतात. तब्येत बिघडली तर डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन्स दाखवल्याशिवाय रजा मंजूर होत नाही. संध्याकाळी 6 चा ऑफिस टाइम असला तरी काम रात्री 11 वाजेपर्यंत चालतं. वीकेंडलाही काम करायला लावतात.
पण काही कंपन्या कर्मचार्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेऊ लागल्या आहेत. ‘मेंटल हेल्थ डे’, ‘अनलिमिटेड सिक लीव’, ‘वीकेंडला मेसेज केला तर पेनल्टी’ असे नियमही काही ठिकाणी लागू झाले आहेत. पण हे अजून अतिशय कमी प्रमाणात आहे.
दुःखातही कामावर यायला सांगणाऱ्या व्यवस्थापनाबद्दल संताप व्यक्त करत अनेकांनी एकच सल्ला दिला “अशा बॉसचा गुलाम होण्यापेक्षा नोकरी बदलणेच उत्तम!” काम महत्त्वाचं आहे. पण भावनांचा आदर, दुःखात दिलासा, आणि माणसाला माणूस म्हणून सन्मान देणं, हेही तितकंच आवश्यक आहे.