

Starlink vs Reliance satellite internet India : भारतात सॅटेलाईट इंटरनेटच्या मुद्द्यावरून एलॉन मस्क यांची 'स्टारलिंक' (Starlink) आणि मुकेश अंबानी यांची 'रिलायन्स इंडस्ट्रीज' (Reliance Industries) यांच्यातील शाब्दिक संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. मस्क यांनी भारतातील इंटरनेट उद्योगातील प्रवेश करताना येणाऱ्या अडचणींबाबत चिंता व्यक्त केली; यावर रिलायन्सने म्हटले की, त्यांना कोणत्याही कंपनीशी स्पर्धा करण्याची भीती वाटत नाही. आता, रिलायन्सच्या या विधानाला स्टारलिंकने प्रत्युत्तर दिले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (X) वर 'स्टारलिंक'ने म्हटले आहे की, कंपनी भारतात गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून काम करत आहे. यादरम्यान त्यांनी नियामक संस्था, उद्योग क्षेत्रातील घटक आणि स्थानिक ऑपरेटर्सशी संवाद साधला आहे. कंपनीचा दावा आहे की, त्यांनी भारतातील इंटरनेट सेवांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारल्या असून, सर्व सरकारी मंजुऱ्याही मिळवल्या आहेत.
आपल्या निवेदनात 'स्टारलिंक'ने स्पष्ट केले की, भारतात सुरक्षित इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे संपूर्ण नेटवर्क भारतातच स्थित असून, ते भारतीय वापरकर्त्यांच्या इंटरनेट ट्रॅफिकला सुरक्षितपणे हाताळण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
'स्टारलिंक'ने पुन्हा एकदा भारतात हाय-स्पीड इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे सांगितले. 'स्टारलिंक'चे हे उत्तर रिलायन्सच्या एका विधानानंतर आले आहे. रिलायन्सने सॅटेलाईट इंटरनेट बाजारपेठेत 'स्टारलिंक'सह इतर सर्व कंपन्यांचे स्वागत केले होते, मात्र त्याच वेळी सर्व कंपन्यांनी भारतीय कायदे आणि नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे अधोरेखित केले होते.
शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी मुकेश अंबानी यांच्या 'रिलायन्स'ने स्पष्ट केले होते की, आम्हाला स्पर्धेची कधीही भीती वाटलेली नाही. स्पर्धा हा एक निकष असतो. आपल्या निवेदनात रिलायन्सने 'जिओ' (Jio) च्या लाँचिंगचाही उल्लेख केला. कंपनीने सांगितले की, २०१६ मध्ये 'जिओ'ने टेलिकॉम बाजारपेठेत प्रवेश केला. त्यावेळी एकही ग्राहक नव्हता. मात्र,िफायतशीर दरातील डेटा सेवा आणि डिजिटल ऑफरच्या जोरावर आज 'जिओ'चे ५३ कोटींहून अधिक (५३० दशलक्ष) ग्राहक आहेत.
सॅटेलाईट कम्युनिकेशन क्षेत्रात 'स्टारलिंक'सह इतर कंपन्यांच्या प्रवेशाचे ते स्वागत करतात. त्याच वेळी, रिलायन्सने स्पष्ट केले की, जिओसह प्रत्येक कंपनीला भारताचे कायदे आणि धोरणांचे पालन करणे बंधनकारक आहे.
मस्क यांनी असा आरोप केला की, भारतातील काही बडे व्यावसायिक हितसंबंध 'स्टारलिंक'ला (Starlink) भारतात प्रवेश करण्यापासून रोखत आहेत. यामुळे बाजारपेठेतील स्पर्धेवर परिणाम होऊ शकतो आणि ग्राहकांना उत्तम पर्याय मिळण्यास विलंब होऊ शकतो. तसेच अंबानी यांच्यावर उपरोधिक टिप्पणी करत त्यांना 'पंतप्रधान अंबानी' असे संबोधले होते. भारतात कामकाज सुरू करण्यासाठी स्टारलिंकला परवानगी मिळण्यास विलंब का होत आहे? मात्र, मस्क यांच्या आरोपांना पुष्टी देणारा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. भारत सरकारनेही कोणत्याही विशिष्ट कंपनीशी भेदभाव केल्याचे किंवा कोणाला झुकते माप दिल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत आणि स्पष्ट केले आहे की, नियम सर्वांसाठी समान आहेत.
स्टारलिंकला उपग्रह दळणवळणासाठी परवाना मिळाला असला, तरी केवळ परवाना मिळाल्यामुळे कंपनी भारतात त्वरित सेवा सुरू करू शकत नाही. त्यांना स्पेक्ट्रम वाटपाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तसेच सुरक्षेशी संबंधित आवश्यक अटींची पूर्तता करावी लागेल. स्पेक्ट्रम वाटपावेळी स्टारलिंकबरोबरच रिलायन्स जिओ आणि भारती समूहाची 'युटेलसॅट वनवेब' यांसारख्या सर्व कंपन्यांना या प्रक्रियेतून जाणे अनिवार्य आहे.