

वॉशिंग्टन : एलॉन मस्क यांची कंपनी ‘स्पेसएक्स’ आता अंतराळात आपल्या उपग्रहांची (Satellites) जागा बदलण्याच्या तयारीत आहे. यावर्षी कंपनी आपल्या हजारो ‘स्टारलिंक’ उपग्रहांची उंची कमी करणार आहे. सध्या हे उपग्रह पृथ्वीपासून 550 कि.मी. उंचीवर आहेत, ते आता 480 कि.मी. या सुरक्षित उंचीवर आणले जातील. ‘स्पेसएक्स’चे इंजिनिअरिंग व्हाईस प्रेसिडेंट मायकल निकोल्स यांनी ही माहिती दिली असून, ही प्रक्रिया 2026 च्या अखेरपर्यंत पूर्ण होईल.
सध्या अंतराळात इंटरनेट, दळणवळण आणि निगराणीसाठी जगभरातील कंपन्या आणि सरकारांकडून मोठ्या प्रमाणावर उपग्रह प्रक्षेपित केले जात आहेत. यामुळे पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये (Low Earth Orbit - LEO) प्रचंड गर्दी झाली आहे. डिसेंबर 2025 मध्ये एका स्टारलिंक उपग्रहामध्ये तांत्रिक बिघाडामुळे स्फोट झाला होता, ज्यामुळे अंतराळात कचरा पसरला. या घटनेमुळे अंतराळातील सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. एकट्या स्टारलिंकने आतापर्यंत सुमारे 10,000 उपग्रह अवकाशात तैनात केले आहेत.
कमी उंचीवर उपग्रह ठेवल्यास टक्कर होण्याचा धोका कमी होतो. कारण, 500 कि.मी. पेक्षा कमी उंचीवर कचर्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. याशिवाय, जेव्हा उपग्रहांचा कार्यकाळ संपेल, तेव्हा वातावरणातील घर्षणामुळे ते लवकर जळून नष्ट होतील. यामुळे निकामी उपग्रह अनेक वर्षे अंतराळात फिरत राहण्याचा धोका टळेल. डिसेंबरमध्ये झालेल्या तांत्रिक अपघाताचा उल्लेख करत कंपनीने मान्य केले की, एका उपग्रहाचा संपर्क तुटल्यामुळे थोड्या प्रमाणात कचरा निर्माण झाला होता.
अलीकडच्या वर्षांत सॅटेलाईट इंटरनेट सेवांच्या वाढत्या मागणीमुळे पृथ्वीची खालची कक्षा व्यावसायिक उपक्रमांचे केंद्र बनली आहे. मात्र, यामुळे भविष्यातील मोहिमा कठीण होण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. केवळ रॉकेट लाँच करण्यापुरती मर्यादित राहिलेली ‘स्पेसएक्स’ आता जगातील सर्वात मोठी सॅटेलाईट ऑपरेटर बनली आहे. जगभरात हाय-स्पीड इंटरनेट पोहोचवण्याचे लक्ष्य गाठतानाच, अंतराळातील सुरक्षितता राखणे ही कंपनीसमोरील मोठी जबाबदारी आहे. ‘स्टारलिंक’ने उचललेले हे पाऊल अंतराळ स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.