

नवी दिल्ली : गेली अनेक दशके पारंपरिक इंधनावरील वाहनांनी रस्त्यावर राज्य केले. आता इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी वाढत आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांत 20 लाख 2 हजार इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. त्यात दुचाकींचा वाटा 12 लाखांहून अधिक आहे.
देशातील इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेने यंदा प्रथमच वर्षभराच्या आत दोन दशलक्ष वाहनांची विक्री केली आहे. हायब्रिड वाहने वगळता हा टप्पा पार केला आहे. कॅलेंडर वर्ष 2024 मध्ये 19 लाख 50 हजार इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती. अनेक वाहनांचे उपलब्ध असलेले पर्याय, ग्राहकांचा बदललेला कल, सरकारचे पूरक धोरण, यामुळे हरित वाहन व्यवस्थेकडे भारताची वेगाने वाटचाल सुरू आहे. अजूनही वर्ष संपण्यास एक महिन्याहून अधिक कालावधी असल्याने हा आकडा आणखी वाढेल.
इलेक्ट्रिक वाहनात दुचाकीचे प्राबल्य असून, खालोखाल चारचाकी आणि तीनचाकी वाहनांना अधिक मागणी दिसून येत आहे. कॅलेंडर वर्ष 2024 मध्ये 11 लाख 50 हजार दुचाकींची विक्री झाली होती. आताच 12 लाखांहून अधिक दुचाकी विकल्या गेल्या आहेत. गतवर्षी एसयूव्ही आणि कार मिळून 99 हजार 429 चारचाकींची विक्री झाली होती. यंदा कार विक्री तब्बल 57 टक्क्यांनी वाढून 1 लाख 56 हजार 455 वर गेली आहे. तीनचाकी वाहनांची विक्री 6 लाख 90 हजारांवर गेली आहे. गतवर्षी हा आकडा 6 लाख 91 हजार होता. तीनचाकी वाहनांच्या विक्रीत यंदा स्थिर वाढ होईल.
क्रिसिटल रेटिंग एजन्सीच्या संचालिका पूनम उपाध्याय म्हणाल्या की, इलेक्ट्रिक वाहन धोरणात काहीसा बदल होऊनही यंदा इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी राहिली आहे. गतवर्षी इलेक्ट्रिक वाहन विक्रीत 27 टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदविण्यात आली होती. तितकी यंदा राहणार नाही. मात्र, दुचाकींच्या जोरावर मध्यम वाढ नोंदविली जाईल. दुचाकी, तीनचाकी आणि कार खरेदी करण्यासाठी ग्राहक पुढे येत आहेत. यात चार्जिंग सुविधांबाबत ग्राहकांचा आत्मविश्वास दिसून येत आहे.