SIR Voter List: 20 राज्यांत वगळलेल्या मतदारांची पुन्हा नोंदणी होणार; SIR वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

SIR Voter List: SIR प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून वगळल्या गेलेल्या पात्र मतदारांसाठी निवडणूक आयोगाने विशेष मोहीम जाहीर केली आहे.
SIR Voter List ECI
SIR Voter List ECIPudhari
Published on: 
Updated on: 

SIR Voter List: विशेष सखोल पुनरिक्षण म्हणजेच SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून काही नावे वगळली गेल्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मतदार यादीतून वगळले गेलेले पात्र मतदार, पहिल्यांदा मतदान करणारे तरुण आणि युवा मतदार यांची नावे पुन्हा यादीत समाविष्ट करण्यासाठी 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

यासाठी आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (CEO) पत्र पाठवून आवश्यक सूचना दिल्या आहेत. या मोहिमेत बूथ लेव्हल अधिकारी (BLO) घराघरांत जाऊन मतदारांची माहिती तपासणार आहेत.

SIRपूर्वीच्या मतदार यादीशी तुलना

या मोहिमेअंतर्गत BLO सध्याच्या मतदार यादीची SIRपूर्वीच्या मतदार यादीशी तुलना करतील. SIRपूर्वीच्या यादीत नाव असले, मात्र सध्याच्या यादीत नाव नसलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी तयार केली जाणार आहे.

यानंतर BLO संबंधित मतदारांच्या घरी जाऊन त्यांची सध्याची परिस्थिती जाणून घेतील. संबंधित व्यक्ती मतदार म्हणून पात्र असल्याचे आढळल्यास त्यांच्याकडून फॉर्म-6 भरून घेतला जाईल. या माध्यमातून त्यांचे नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया केली जाईल.

आठवड्याला 20 ते 25 मतदारांशी संपर्क

निवडणूक आयोगाने BLO यांना दर आठवड्याला किमान 20 ते 25 मतदारांशी संपर्क साधण्याचे उद्दिष्ट दिले आहे. ही विशेष मोहीम साधारण एका महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रक्रियेत BLO प्रत्येक मतदाराची सध्याची स्थिती नोंदवतील.

पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांवरही लक्ष

या मोहिमेचा उद्देश केवळ वगळलेल्या मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करणे एवढाच नाही. पहिल्यांदा मतदान करणारे तरुण आणि युवा मतदार यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे. BLO घराघरांत जाऊन पात्र मतदारांची माहिती घेतील आणि आवश्यक असल्यास फॉर्म-6 भरून घेतील.

SIR Voter List ECI
Gold Price Today: आठवड्यात सोन्याच्या भावात तब्बल ₹2,800 ची घसरण; चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव

राजकीय पक्षांनाही माहिती दिली जाणार

BLO यांनी तयार केलेली यादी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या बूथ लेव्हल एजंट्ससोबत (BLA) शेअर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच भरलेले फॉर्म-6 आणि प्रत्यक्ष पाहणीचा अहवाल संबंधित निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडे (ERO) जमा केला जाईल.

कायद्यानुसार मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याबाबत अंतिम प्रक्रिया करण्याचा अधिकार ERO यांच्याकडे आहे. यानंतर तयार होणारी बूथनिहाय यादीही राजकीय पक्षांसोबत शेअर केली जाणार आहे. त्यामुळे वगळले गेलेले पात्र मतदार मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी पुन्हा अर्ज करू शकतील.

बेघर आणि कामगारांसाठी विशेष शिबिरे

मतदार नोंदणीची प्रक्रिया सोपी करण्यासाठी बूथ स्तरावर विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. नाईट शेल्टर, कामगार वसाहती, बेघर नागरिक आणि समाजातील वंचित घटकांतील पात्र व्यक्तींची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठीही विशेष शिबिरे घेण्याची शक्यता आहे.

SIR Voter List ECI
Drishyam 3 Review: ‘दृश्यम 3’ पाहावा की नाही? अजय देवगणच्या चित्रपटातील थरार, अभिनय अन् क्लायमॅक्स कसा आहे?

शैक्षणिक संस्थांमधूनही जनजागृती

मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि ERO यांच्या माध्यमातून पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदवण्याची माहिती दिली जाणार आहे. यासाठी शैक्षणिक संस्था, स्थानिक जनजागृती कार्यक्रम, SVEEP उपक्रम आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून माहिती पोहोचवली जाणार आहे. या संपूर्ण मोहिमेवर CEO, DEO आणि ERO स्तरावर नियमित देखरेख आणि आढावा घेतला जाणार आहे.

पात्र नागरिकांना नोंदणीची संधी

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की मतदार नोंदणी ही सातत्याने सुरू असलेली प्रक्रिया आहे. एखाद्या पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीत अद्याप नसेल किंवा काही कारणामुळे नाव वगळले गेले असेल, तर ती व्यक्ती मतदार नोंदणीसाठी अर्ज करू शकते.

SIR प्रक्रियेनंतर वगळले गेलेले पात्र मतदार, नवीन मतदार आणि युवा मतदार यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना नोंदणीची संधी उपलब्ध करून देणे हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news