

Illegal betting case
कर्नाटक काँग्रेसचे आमदार केसी वीरेंद्र यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) शनिवारी गंगटोकमध्ये अटक केली. त्यांच्यावर बेकायदेशीर ऑनलाइन आणि ऑफलाइन बेटिंगमध्ये सहभाग असल्याच्या आरोप आहे. केसी वीरेंद्र त्यांच्या सहकाऱ्यांसह सिक्कीममधील गंगटोकला गेले होते. तिथे त्यांनी कथितरित्या एका कॅसिनोसाठी जमीन भाड्याने घेतली होती.
ईडीने त्यांच्याशी संबंधित ३० ठिकाणांवर छापा टाकले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना अटक केली. या कारवाईत १२ कोटी रुपये रोख रकमेसह सुमारे १ कोटी परकीय चलन, सुमारे ६ कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि सुमारे १० किलो चांदीच्या वस्तू आणि ४ वाहने जप्त केली होती. ईडीने त्यांची १७ बँक खाती आणि दोन बँक लॉकर गोठवले आहेत.
तसेच वीरेंद्र यांचा भाऊ केसी नागराज आणि त्यांचा मुलगा पृथ्वी एन राज यांच्या घरातूनही त्यांच्या मालमत्तेशी संबंधित अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यांचा सहकारी असलेला आणखी एक भाऊ के सी थिप्पेस्वामी तसेच पृथ्वी एन राज हे दुबईतून कथितरित्या ऑनलाइन गेमिंगचा व्यवसाय चालवत होते.
वीरेंद्र यांना अटकेनंतर गंगटोक न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. गोव्यात ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणाचा एक भाग म्हणून या काँग्रेस आमदाराशी संबंधित पाच कॅसिनोंची झाडाझडती घेतली. त्यात पपीज कॅसिनो गोल्ड, ओशन रिव्हर्स कॅसिनो, पपीज कॅसिनो प्राइड, ओशन 7 कॅसिनो आणि बिग डॅडी कॅसिनोचा समावेश होता.
या झाडाझडतीदरम्यान, संशयित आरोपी केसी वीरेंद्र हे किंग567, राजा567, पपीज003 आणि रथना गेमिंग सारख्या अनेक ऑनलाइन बेटिंग साइट्स चालवत असल्याचे आढळून आले आहे.
तसेच वीरेंद्र यांचा भाऊ केसी थिप्पेस्वामी दुबईतून तीन व्यावसायिक कंपन्या चालवत आहे. त्यात डायमंड सॉफ्टेक, टीआरएस टेक्नॉलॉजीज, प्राइम 9 टेक्नॉलॉजीजचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या कंपन्या केसी वीरेंद्र यांचे कॉल सेंटर्स आणि गेमिंग व्यवसायाशी संबंधित असल्याचीही माहिती समोर आली आहे.
केसी वीरेंद्र हे कर्नाटकमधील चित्रदुर्ग मतदारसंघातील आमदार आहेत.