

X Post against Prime Minister case registered against Tejashwi Yadav in Gadchiroli
गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी 'एक्स' वर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी फिर्याद दिल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे नेते व बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या विरोधात गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिहार राज्यातील गया येथे पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्यापूर्वी तेजस्वी यादव यांनी पंतप्रधानांबाबत 'एक्स'वर पोस्ट टाकली. ही पोस्ट आक्षेपार्ह असून, त्यात शांतता भंग होऊन समाजात तेढ निर्माण होईल, असा मजकूर आहे. शिवाय या पोस्टमुळे पंतप्रधानांची बदनामी झाली, असा आरोप करीत गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात आज फिर्याद दिली. यावरुन पोलिसांनी तेजस्वी यादव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) १९६ (१) (अ), १९६ (१) (ब), ३५६ (२), ३५६ (३), ३५२, ३५३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण करीत आहेत.