ECI press conference | 'वोट चोरी' शब्द वापरणे हा भारतीय संविधानाचा अपमान; मुख्य निवडणूक आयुक्तांचा राहुल गांधींना नाव न घेता टोला
ECI press conference Gyaneshkumar
नवी दिल्ली : वोट चोरी असे शब्द वापरणे म्हणजे भारतीय संविधानाचा अपमान आहे, असा टोला केंद्रीय निवडणूक आयोगाचचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी नाव न घेता काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लगावला. गेल्या काही काळात राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर सवालांची सरबत्ती केली होती.
प्रेस कॉन्फरन्समध्ये सादरीकरण करत त्यांनी निवडणूक चोरली गेल्याचा आरोप केला होता. त्यांनी दुबार मतदान, नवमतदार नोंदणी, एकाच ठिकाणी अनेक मतदार यात घोटाळा झाल्याचे राहुल गांधींनी सांगितले होते. त्या मुद्यांवर ज्ञानेशकुमार यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये आयोगाचे मत मांडले.
आमच्यासाठी सर्व समकक्ष...
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार म्हणाले की, निवडणूक आयोग राजकीय पक्षांमध्ये भेदभाव करत नाही. आमच्यासाठी कोणीही विरोधी पक्ष नाही. सर्वजण समकक्ष आहेत. 18 वर्षांवरील प्रत्येक जण मतदान करू शकतो.
मतदार यादी पुनरीक्षणची (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन - SIR) सुरवात बिहारपासून केली. यात सर्व पक्षांकडून निर्देशित केलेल्या बीएलओंनी एक प्रारूप यादी तयार केली. त्याची एक कॉपी सर्वांना दिली आहे.
आयोगाचे दरवाजे सर्वांसाठी खुले...
बिहारची ही यादी तयार करताना त्यावर सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सही केली आहे. त्रुटी काढण्यासाठी निर्धारीत वेळेत सर्वजण वेळ आणि योगदान देत आहेत. 28370 हरकती आल्या. 1 जुलैपर्यंत 18 वर्षे पूर्ण झालेल्या किंवा 1 ऑक्टोबरला 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांनीही अर्ज दिला आहे. बिहारच्या SIR साठी अजुनही 15 दिवसांचा कालावधी आहे.
सर्व पक्षांना आवाहन करत आहोत की, प्रारूप यादीत त्रुटी असेल तर निर्धारीत अर्जाद्वारे दाखवून द्यावे. आयोगाचे दरवाचे सर्वांसाठी खुले आहेत. सर्वजण पारदर्शक काम करत आहेत. सत्यापण, व्हिडिओ सर्वकाही केले जात आहे.
राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना टोला...
स्थानिक पातळीवर राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांनीच निर्देशित केलेल्या बीएलओंनी तयार केलेली यादी त्यांच्या पक्षाच्या राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांपर्यंत पोहचत नाही असे दिसते. त्यातूनच भ्रम निर्माण केले जात आहेत. बिहार SIR पूर्ण करण्यासाठी सर्वजण कटिबद्ध आहेत. बिहारचे 7 कोटींवर मतदार निवडणूक आयोगासोबत आहेत.
मतदानानंतर 45 दिवसांत याचिका दाखल केली गेली नाही. आता वोट चोरी असे शब्द वापरणे हा भारतीय संविधानाचा अपमान आहे.
मतदार भगिनी, माता यांचे व्हिडिओ द्यायचे का?
मशिन रिडेबल मतदार यादीबाबत बोलायचे तर सुप्रीम कोर्टाने 2019 मध्येच म्हटले होते की, मतदाराच्या खासगीपणावर मर्यादा येऊ शकतात. असे काही गैरप्रकार प्रकार झालेले आहेत. मतदार भगीनी, माता यांचे व्हिडिओ शेअर केले गेले पाहिजेत का?
मतदार आपल्या आवडत्या नेत्याला मत देतो. लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेत मोठी यंत्रणा कार्यरत असते. लाखो कर्मचारी यात असतात. या पारदर्शी प्रक्रियेत कोणी वोट चोरी करू शकतो का?
पुरावे का देत नाही?
दुबार मतदानाचे आरोप झाले. पुरावे मागितल्यावर उत्तर दिले गेले नाही. अशा आरोपांना निवडणूक घाबरत नाही. निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भारताच्या मतादारांवर निशाणा साधला जात असेल तर निवडणूक आयोग निर्भयपणे सर्व गरीब श्रीमंत लहानमोठ्या सर्व धर्मांच्या मतदारांसोबत पहाडासारखा उभा आहे.

