

Rahul Gandhi Bihar elections 2025 Vote Adhikar Yatra Voter rights campaign
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी निवडणूक आयोगावर यांनी बिहारमध्ये 'मतदान अधिकार यात्रा' (Vote Adhikar Yatra) काढण्याचे ठरवले आहे. 16 दिवसांची ही यात्रा असणार आहे. ती 23 जिल्ह्यातून जाणार आहे. सुमारे 1300 हून अधिक किलोमीटरची ही यात्रा असणार आहे.
या यात्रेद्वारे त्यांनी निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत झालेल्या कथित फेरफाराविरोधात आवाज उठवला आहे. या यात्रेचे नेतृत्व काँग्रेसकडून होत असून महाआघाडीतील सर्व घटक पक्ष यात सहभागी होत आहेत.
रविवारी (17 ऑगस्ट) पासून सुरू होणारी ही यात्रा बिहारमधील 23 पेक्षा अधिक जिल्ह्यांमधून जाईल. या मोहिमेचा उद्देश म्हणजे लोकांना त्यांच्या मतदानाच्या अधिकाराविषयी जागरूक करणे आणि एकाही मतदाराचे नाव यादीतून वगळले जाऊ नये, याची खात्री करणे.
राहुल गांधी यांनी ‘एक व्यक्ती, एक मत’ या लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वावर जोर देत याला ‘संविधान वाचवण्याची लढाई’ म्हणून संबोधले आहे. “आम्ही मतदार अधिकार यात्रा लोकांपर्यंत घेऊन जात आहोत. हा आपल्या लोकशाही हक्काचे रक्षण करण्याचा लढा आहे,” असे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले.
आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी या यात्रेला पाठिंबा देत म्हटले की, “कोणाच्याही हक्कांवर गदा येऊ नये, कोणताही मतदार यादीतून वगळला जाऊ नये, यासाठी आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहोत.” त्यांनी यासाठी एक प्रचारगीतही सोशल मीडियावर प्रसिद्ध केले असून बिहारमधील जनतेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या प्रकरणाला खळबळजनक वळण तेव्हा मिळाले जेव्हा विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेवर आक्षेप घेतला. त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेला ‘वोटबंदी’ असे संबोधून निवडणूक आयोगावर सत्ताधारी भाजपशी संगनमत असल्याचा आरोप केला.
राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट रोजी पुराव्यानिशी मतचोरी कशी होते हे सांगितले. त्यांनी कर्नाटकमधील महादेवपूरा विधानसभा मतदारसंघातील माहितीचा दाखला देत, निवडणूक आयोग आणि भाजपमधील कथित संगनमताचे आरोप केले.
निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या आरोपांना स्पष्टपणे फेटाळले आहे. आयोगाने त्यांना आपल्या तक्रारीवर प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. मात्र, राहुल गांधी यांनी “मी आधीच संविधानावर शपथ घेतली आहे,” असे म्हणत हे नाकारले.
बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली 'वोट अधिकार यात्रा' ही विरोधकांची महत्त्वाची मोहीम ठरत आहे.
लोकशाही मूल्ये, मतदानाचा अधिकार आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता या मुद्द्यांवर यामधून मोठी चर्चा निर्माण होणार आहे. महाआघाडीच्या एकत्रित सहभागामुळे ही यात्रा बिहारच्या राजकारणात एक निर्णायक क्षण ठरू शकते.