

Donald Trump Narendra Modi West Bengal Election Results 2026
नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाचे पडसाद आता जागतिक स्तरावर उमटू लागले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष अभिनंदन केले असून, "भारताचे मोठे नशीब आहे की त्यांना मोदींसारखा खंबीर नेता लाभला," अशा शब्दांत त्यांचा गौरव केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची १५ वर्षांची एकहाती सत्ता उलथवून टाकत भाजपने पहिल्यांदाच कमळ फुलवले आहे. या ऐतिहासिक सत्ताबदलानंतर व्हाईट हाऊसकडून अधिकृत निवदेन प्रसिद्ध करण्यात आले आहे. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांनी माहिती दिली की, "गेल्या महिन्यात झालेल्या दूरध्वनी संभाषणात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींविषयी आपला आदर व्यक्त केला होता. भारताला त्यांच्यासारखा दूरदृष्टी असलेला नेता मिळणे हे भाग्याचे लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले होते. बंगालमधील या ऐतिहासिक आणि निर्णायक विजयाबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधानांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे."
राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) दीर्घकाळापासून वर्चस्व होते. मात्र, या निकालाने ममता बॅनर्जी यांची १५ वर्षांची राजवट संपुष्टात आणली आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या मध्यावर मिळालेला हा विजय भाजपची राजकीय पकड अधिक मजबूत करणारा मानला जात आहे.
विजयानंतर नवी दिल्ली येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी भावूक झाले होते. ते म्हणाले की, "बंगालच्या नशिबात आज एका नव्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात झाली आहे. हा केवळ भाजपचा विजय नसून लोकशक्तीचा आणि सुशासनाचा विजय आहे. पश्चिम बंगालच्या जनतेसमोर मी नतमस्तक आहे."
अनेक वर्षांपासून पश्चिम बंगाल हा भाजपसाठी एक अभेद्य गड राहिला होता. देशाच्या इतर भागांत भाजपची लाट असतानाही बंगालमध्ये पक्षाला संघर्ष करावा लागत होता. १० कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या या राज्याचा निकाल केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून, त्याचे राष्ट्रीय राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. या विजयामुळे पूर्व भारतात भाजपच्या विस्ताराची प्रक्रिया आता पूर्णत्वास गेल्याचे मानले जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपचा हा विजय आकस्मिक नसून ती अनेक वर्षांच्या नियोजनाची फलश्रुती आहे. मागील काही निवडणुकांमध्ये भाजपने आपली मतदानाची टक्केवारी ४० टक्क्यांपर्यंत नेली होती. तळागाळात मजबूत संघटनात्मक बांधणी नसतानाही, केवळ मोदींच्या प्रतिमेवर आणि विकासाच्या मुद्द्यावर पक्षाने बंगालच्या मतदारांना आपलेसे केले आणि सत्ता हस्तगत केली.