

बंगळूर : सत्ता हस्तांतरणावरून प्रदेश काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरूच असून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार 6 किंवा 9 जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असा दावा त्यांचे निकटवर्ती आमदार इक्बाल हुसेन यांनी केला आहे. गृहमंत्री डॉ. जी परमेश्वर म्हणाले, हायकमांडने नेतृत्वाबाबतचा गोंधळ त्वरित दूर करावा.
बंगळूरमध्ये मंगळवारी (दि. 30) पत्रकारांशी बोलताना हुसेन म्हणाले, प्रदेश काँग्रेसमधील सर्व घडामोडी हायकमांडला माहिती आहेत. राज्यात सरकार स्थापनेच्या वेळी झालेल्या करारानुसार उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होतील. ही घडामोड 6 किंवा 9 जानेवारी रोजी होण्याची 200 टक्के खात्री आहे. या मुद्द्यावर कोणताही गोंधळ नाही. आमचे नेते शिवकुमार मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची इच्छा आहे आणि ती आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे.
आमदार हुसेन यांनी पंधरा दिवसांपूर्वीही अशाच आशयाचे वक्तव्य केले होते. येत्या संक्रांतीपर्यंत मुख्यमंत्री बदल होईल आणि शिवकुमार शपथ घेतील, असे ते म्हणाले होते. मात्र, त्यावेळी शिवकुमारांनी तसे काही तातडीने होण्याचा इन्कार केला होता. मात्र, पुन्हा हुसेन यांनी तेच वक्तव्य केले असून, अजून त्याचा इन्कार शिवकुमारांनी केलेला नाही.
नेतृत्व बदलाचा प्रश्न मार्गी लावावा : गृहमंत्री
गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर म्हणाले, हायकमांडने नेतृत्वाबाबतचा गोंधळ त्वरित दूर करावा. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यापुढे अर्थसंकल्प तयारी बैठका घेणार आहेत. त्यामुळे गोंधळ घालून अर्थसंकल्प तयार करता येत नाही. त्यामुळे अर्थसंकल्प तयारी बैठका सुरू होण्यापूर्वी हायकमांडने या गोंधळाला आळा घालावा. परंपरेनुसार राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारीमध्ये सुरू होईल. कोणाला तरी अर्थसंकल्प सादर करायचाच आहे. त्यामुळे हायकमांडने सर्व गोंधळ दूर करावा.