

आर. एच. नटराज
बंगळूर : मुख्यमंत्रिपदी कायम राहण्याचा हेका एस. सिद्धरामय्यांनी न सोडल्यामुळे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार अस्वस्थ असून, त्यांनी भाजपशी हातमिळवणी करण्याचे संकेत दिले आहेत. शिवकुमार यांनी गोवा गाठत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी रविवारी रात्री दोन तास चर्चा केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानंतर सोमवारी पहाटेच डॉ. सावंत दिल्लीला रवाना झाले असून, त्यामुळे कर्नाटकच्या राजकारणात खळबळ माजण्याची शक्यता आहे. ठरावीक संख्येइतके आमदार घेऊन आल्यास कर्नाटकात महाराष्ट्र पॅटर्न राबवण्याची तयारी असल्याचे भाजपने स्पष्टपणे शिवकुमारांना कळवले आहे. त्यामुळे शिवकुमार क़ाँग्रेसशी एकनिष्ठ राहतात की, एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे फुटून भाजपशी हातमिळवणी करतात, याबाबत कुतूहल आहे.
एका खासगी कार्यक्रमासाठी पणजीला गेलेले उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी रविवारी (दि. 28) रात्री गोव्यातील बाणावली येथील एका खासगी हॉटेलमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी बैठक घेऊन दीर्घ चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
डॉ. सावंत हे संघ परिवारातील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय आहेत. यापूर्वी कर्नाटकातील काँग्रेस-निजद नेतृत्वाखालील युती सरकार कोसळवण्यात आणि येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार स्थापनेत सावंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्यात सावंत यांनी मोठी भूमिका बजावली होती, असे मानले जाते. आता त्यांच्याच माध्यमातून कर्नाटकात सत्तांतर घडवून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. रविवारी (दि. 28) रात्रीच्या बैठकीनंतर डॉ. सावंत दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे या भेटीमागे स्पष्ट राजकीय हेतू असल्याचे सांगितले जात आहे. शिवकुमार-सावंत चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
दरम्यान, शिवकुमार यांची सोमवारी (दि. 29) सकाळी गोवा विधानसभेचे अध्यक्ष गणेश गावकर यांनीही भेट घेतली. त्यामुळे शिवकुमारांच्या गोवा भेटीदरम्यान काय दडलंय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्य सरकारने अडीच वर्षे कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सत्ता हस्तांतरणाच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा असलेले उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्या पडद्यामागे अनेक हालचाली सुरू आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापनेदरम्यान हायकमांडच्या उपस्थितीत सत्ता वाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यात आला होता. त्यामुळे आता शिवकुमार आणि त्यांचे निकटवर्तीय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अडीच वर्षे पूर्ण केल्यानंतर पद सोडावे, अशी मागणी करत आहेत. तथापि, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी सत्ता वाटपाचा फॉर्म्युला नाकारला आहे. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याची घोषणा केली आहे.