

DK Shivakumar elected CLP leader
बंगळूरु : कर्नाटकच्या राजकारणातील मोठ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज बंगळूरु विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. यावेळी डी. के. शिवकुमार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. दरम्यान, कर्नाटकात नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू असताना, काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांचे ज्योतिषी 'आराध्य' यांनी असा दावा केला आहे की, त्यांनी शिवकुमार यांना ३ जून रोजी सायंकाळी ५:१५ वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा सल्ला दिला आहे.
बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी पहिला प्रस्ताव मांडला, ज्यामध्ये नवीन विधिमंडळ पक्षनेत्याचा निर्णय काँग्रेस हायकामांड करेल असे सांगण्यात आले होते. या प्रस्तावाला डॉ. जी. परमेश्वर यांनी अनुमोदन दिले. बैठकीत हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. बैठकीदरम्यान काँग्रेस विधिमंडळ पक्षाने सिद्धरामैया यांच्या सेवांचे कौतुक केले. पक्ष आणि कर्नाटकच्या जनतेसाठी त्यांनी दिलेल्या विशेष योगदानाचा गौरव करत त्यांचे आभार मानण्यात आले.
काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले की, डी. के. शिवकुमार हेच राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील. माजी मुख्यमंत्री सिद्धरामैया यांच्या राजीनाम्यानंतर आता याबाबीत कोणतीही शंका उरलेली नाही. हायकमांडने निर्णय घेतला आहे की डी. के. शिवकुमार हेच आमचे पुढील मुख्यमंत्री असतील. याची घोषणा आधीच झाली आहे आणि सिद्धरामैया यांनीही तसे जाहीर केले आहे. सिद्धरामैया सरकारच्या काळातील चांगली कामे पुढेही सुरू राहतील, अशी आम्हाला आशा आहे. ही एक मोठी जबाबदारी असून आमचे नवीन मुख्यमंत्री ती यशस्वीपणे पार पाडतील," असे जारकीहोळी म्हणाले.
सिद्धरामैया यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबद्दल बोलताना जारकीहोळी यांनी सांगितले की, काँग्रेस हायकामांडने त्यांना राज्यसभेच्या जागेची ऑफर दिली होती, परंतु त्यांनी ती स्वीकारण्यास नकार दिला. सिद्धरामैया यांना राज्यातील राजकारणातच सक्रिय राहायचे असून, २०२८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणणे हे त्यांचे ध्येय आहे.
कर्नाटकात नवीन सरकार स्थापनेच्या संदर्भात वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना, काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि पक्षाचे कर्नाटक प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला आज बंगळुरू येथे पोहोचले.