IndiGo
नवी दिल्ली : विमान कंपनी इंडिगोला सुमारे १,७०० वैमानिकांच्या सिम्युलेटर प्रशिक्षणातील त्रुटींबद्दल नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गेल्या महिन्यात इंडिगो कंपनीकडून प्राप्त झालेली कागदपत्रे आणि उत्तरांची तपासणी केल्यानंतर डीजीसीएने ही नोटीस जारी केली. या तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
डीजीसीएला असे आढळून आले की, इंडिगोच्या सुमारे १७०० वैमानिकांना 'कॅटेगरी सी' किंवा जोखमीच्या विमानतळांसाठीचे प्रशिक्षण अयोग्य सिम्युलेटरवर देण्यात आले. यामध्ये पायलट-इन-कमांड आणि फर्स्ट ऑफिसर या दोन्ही दर्जाच्या वैमानिकांचा समावेश आहे. वैमानिकांना अशा सिम्युलेटरवर प्रशिक्षण देण्यात आले, ज्यांना लेह, कोझिकोड आणि काठमांडू या विमानतळांसाठी आवश्यक असलेली मान्यताच नव्हती. ही तिन्ही विमानतळे 'क्रिटिकल' म्हणजेच विशेष आव्हानात्मक म्हणून वर्गीकृत आहेत. कालीकतसारख्या 'टेबल-टॉप' धावपट्टी असलेल्या विमानतळावर विमान चालवण्यासाठी विशेष कौशल्याची आणि प्रशिक्षणाची गरज असते.
कालीकत, लेह आणि काठमांडू यांसारख्या विमानतळांवर विमान उतरवणे आणि उड्डाण करणे हे अत्यंत कौशल्याचे काम असते. येथील भौगोलिक परिस्थिती आणि धावपट्टीच्या रचनेमुळे वैमानिकांना उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाची गरज असते. सिम्युलेटर प्रशिक्षणामुळे अशा कठीण परिस्थितीत विमान सुरक्षितपणे हाताळण्याची तयारी होते. त्यामुळे या प्रशिक्षणातील कोणत्याही त्रुटीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते आणि म्हणूनच डीजीसीएने या प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे.
DGCA च्या पुनरावलोकनात असेही समोर आले की, कंपनीने प्रशिक्षणासाठी वापरलेले अनेक 'फुल फ्लाईट सिम्युलेटर' (Full Flight Simulators) या विशिष्ट विमानतळांसाठी पात्र किंवा मंजूर नव्हते. देशभरातील २० सिम्युलेटरमध्ये या त्रुटी आढळल्या आहेत, ज्यात दिल्ली, चेन्नई आणि हैदराबाद येथे प्रत्येकी दोन, ग्रेटर नोएडा आणि गुरुग्राममध्ये प्रत्येकी पाच आणि बंगळूरमध्ये चार सिम्युलेटरचा समावेश आहे. हे सर्व सिम्युलेटर तिन्ही 'क्रिटिकल' विमानतळांच्या प्रशिक्षणासाठी अपात्र असल्याचे निष्पन्न झाले. DGCA ने आपल्या नोटिशीत इंडिगोच्या प्रशिक्षण संचालकांना जबाबदार धरले आहे.
इंडिगोला उत्तर देण्यासाठी १४ दिवसांची मुदत दिली आहे. "ही नोटीस मिळाल्यापासून १४ दिवसांच्या आत, तुमच्यावर या चुकीबद्दल लागू असलेल्या विमान नियमांनुसार कारवाई का केली जाऊ नये, याचे कारण स्पष्ट करावे," असा इशारा DGCA ने दिला आहे. जर कंपनीने दिलेल्या मुदतीत उत्तर दिले नाही, तर त्यांच्याकडे बचावासाठी काहीही नाही असे गृहीत धरून एकतर्फी कारवाई केली जाईल, असेही नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे. इंडिगोने नोटीस मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. "आमच्या काही वैमानिकांच्या सिम्युलेटर प्रशिक्षणासंदर्भात DGCA कडून कारणे दाखवा नोटीस मिळाली आहे. आम्ही या नोटिशीचे पुनरावलोकन करत असून, दिलेल्या मुदतीत उत्तर देऊ," असे इंडिगोच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे.