

Rajasthan Highway Tragedy
राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. येथील खाटू श्याम आणि सालासर बालाजी मंदिरातून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप व्हॅनने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात एकूण ११ जण ठार झाले. यात ७ मुले आणि ४ महिलांचा समावेश आहे. या अपघातात ८ जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी पहाटे बापी गावाजवळ घडली.
दौसाचे पोलिस अधीक्षक सागर राणा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, खाटू श्याम आणि सालासर बालाजी मंदिरातून दर्शन घेऊन भाविक पिकअपमधून उत्तर प्रदेशातील एटा येथील त्यांच्या गावी परतत होते. यादरम्यान मनोहरपूर महामार्गावर पहाटे ४ ते ५ च्या सुमारास त्यांच्या वाहनाला अपघात झाला.
पिकअप वाहनातून २० जण प्रवास करत होते. या दरम्यान पिकअपने महामार्गाच्या सर्व्हिस लेनमध्ये उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या अपघातातील जखमी आठपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली आहे.
दौसा जिल्ह्यातील बापी गावाजवळील प्रवासी पिकअप आणि ट्रेलर ट्रक यांच्यात झालेल्या अपघाताबद्दल माहिती देताना दौसाचे उपअधीक्षक रवी प्रकाश शर्मा यांनी सांगितले, "या अपघातात एकूण ११ जणांचा मृत्यू झाला."
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दौसा येथे अपघाताच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रति त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे. राजस्थान सरकारच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.