

prakash ambedkar claims devendra fadnavis in pm race
नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे हिंदी लागू करण्याच्या पाठीमागे ते लागले आहेत. यासाठी त्यांना राज्यात कोणीही विरोधक नको आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केला. राज्य सरकारमधील मंत्री कितीही चुकले तरीही त्यांना एका शब्दाने मुख्यमंत्री जाब विचारत नाहीत. हे देवेंद्र फडणवीस यांचे धोरण झाले असल्याचा आरोप त्यांनी केला. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे प्रकरणावर नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
७/११ च्या मुंबई बॉम्बस्फोटाकडे ज्या पद्धतीने बघण्यात आले. त्यानंतर झालेल्या कुठल्याही बॉम्बस्फोटाकडे लक्ष देण्यात आले नाही, असा दावा देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला. पुण्यातील जर्मन बेकरी, फर्ग्युसन कॉलेज, मुंबईतील कबुतरखाना, गिरगाव अशा सगळ्या बॉम्बस्फोटांच्या पाठीमागे न शोधण्याचे कारण विरोधकांनी सत्तेला विचारले पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रत्येक वेळेस विशेष तपास पथक अपयशी का होते? याची कारणे तपासली पाहिजेत. ७/११ प्रकरणात उच्च न्यायालयाने वाभाडे काढले आहेत. सुप्रीम कोर्ट काय करते हे लक्ष द्यावे लागेल, असे ते म्हणाले.
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी न करता न्यायालयाच्या पद्धतीने चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.उच्च न्यायालयाच्या निकालावरून दिसत आहे की, आरोपी बाहेर आहेत दुसऱ्यांनाच तुरुंगात टाकले आहे, असा दावा देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला.ताडा, मकोका या कायद्यांनी पोलिसांची तपास कौशल्य मारून टाकल आहे, असे ते म्हणाले.