

Prakash Ambedkar on PM Modi
नागपूर : जागतिक दहशतवादाचे केंद्र असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवून त्या देशाचे पाच तुकडे करण्याची संधी ऑपरेशन सिंदूरने निर्माण केली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कमकुवत राजकीय नेतृत्वामुळे ही संधी गमावली. जनतेने आता पुन्हा अशा लोकांना सत्तेत निवडून द्यायचे का ?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
परवाना भवन येथे फुले- आंबेडकर इंटलेक्चल फोरमच्या वतीने आयोजित ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या घडामोडी या विषयावर आयोजित व्याख्यानात अॅड. प्रकाश आंबेडकर बोलत होते.
राजकारणात येणारी संधी सोडायची नसते, याकडे लक्ष वेधत त्यांनी सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख त्यांनी लुटुपुटीची लढाई असाही केला. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान विरोधात हवाई हल्ले करून येथील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. मात्र, हल्ले केल्याचे दोनच दिवसानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या दबावापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही युद्ध थांबवले. मोदींचा आंतरराष्ट्रीय राजकारणात दबदबा असल्याचे चित्र भाजपकडून उभे केले जात असले तरी ते प्रत्यक्षात किती खोटे आहे हे दिसून आले.
भारताचे मित्र रशिया, फ्रान्स व इतर अनेकांनी भारताची साथ दिली नाही. त्यामुळेच मोदींना माघार घ्यावी लागली. 1971 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे तुकडे करीत बांगलादेशची निर्मिती केली. भाजपकडून तत्त्वहीन राजकारण केले जात आहे, जे येणाऱ्या काळात देशासाठी नक्कीच घातक आहे. सध्या सुरू असलेल्या राजकारणात देश सुरक्षापेक्षाही आपले महत्त्व कसे वाढेल? यावर नेत्यांचा भर आहे.
अनेक दशके अमेरिका पाकिस्तानला मदत करीत आहे. यापुढेही करणार असल्याचे माहित असूनही ऑपरेशन सिन्दुर निमित्ताने रशियाने दिलेली मदत नाकारत अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या पायाशी मोदी सरकारने लोळण घेतले. ऑपरेशन सिन्दुरनंतर केंद्र सरकारने जनतेपुढे वस्तुस्थिती मांडणे गरजेचे होते. पण असे झाले नाही. आता नागरिकांनीच सरकारला जाब विचारत पुन्हा सत्तेत आणायचे की नाही याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
देशाची फाळणी झाल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकसभेची निवडणूक कसे हरले याची आठवण सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, काश्मीरबाबत तोडगा काढावा, अशा आग्रहाचे बाबासाहेब होते. एक तर पूर्ण काश्मीर घ्या किंवा पूर्ण सोडून द्या, अशी परखड भूमिका त्यांची होती. पण त्यांच्या भूमिकेला काँग्रेस-डावे, संघ, हिंदू महासभा यांचा विरोध होता. याच सर्वांनी त्यांना निवडणुकीत पुढे पराभूत केले. पराभवानंतर देखील बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांसाठी काढलेल्या पत्रकात पीओकेच्या मुद्द्यावर वेळीच तोडगा न काढल्यास येणाऱ्या काळात या मुद्द्यावर रक्तपात सुरूच राहील, असे भाकित अॅड. आंबेडकर यांनी केले होते.