

पंढरपूर : समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला समाजाच्या मुख्यधारेत आणणार्या आणि भागवत धर्माचा विचार आपल्या लेखणीने व वाणीने देशभर पोहोचविणार्या संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर येथील मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात येईल. तसेच संत नामदेव महाराजांच्या समाधीस्थळी जागतिक दर्जाचे स्मारक उभारताना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. त्यांचे विचार हे त्यांचे खरे स्मारक आहे. हे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पंढरपूर येथे आयोजित श्री संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या 675 संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गुरू गोविंदसिंग, संत कबीर यांनी संत नामदेवांचा उल्लेख अत्यंत आदराने केला आहे. मीराबाई, नरसिंह मेहता यांच्या काव्यातदेखील नामदेव महाराजांचे विचार पहायला मिळतात. भारताच्या सर्व दिशांना जोडण्याचे आणि खर्या अर्थाने भागवत धर्मातील विचार वैश्विक करण्याचे कार्य त्यांनी केले. सामाजिक समरसतेचे वस्त्र विणण्याचे, संपूर्ण व्यवस्था बदलण्याचे आणि समाजाला एकतेचे मूल्य देण्याचे कार्य नामदेव महाराजांनी केले. संत कबीर, दादू, गरीबदास यांनी विचारांची प्रेरणा संत नामदेवांकडून घेतली. आपल्या संतभूमीत अभंगांच्या माध्यमातून संतांचा हा विचार आपल्यापर्यंत पोहोचला आहे.
संत नामदेव महाराजांनी देशातील 22 राज्यात भ्रमण करून भागवत धर्माचा विचार पोहोचविला. संत नामदेव केवळ वारकरी नव्हते, तर भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचे पाईक होते. त्यांनी भाषेचे बंधन झुगारले, सीमांची कुंपणे तोडली आणि भक्तीचा ओघ संपूर्ण भारतात नेण्याचे कार्य केले. विठ्ठल मंदिरात चोखोबांची समाधी उभी करून विखंडीत समाजाला समाजात जन्माने नव्हे तर कर्माने व्यक्ती मोठा होतो, हा संदेश दिला. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, देशाची संस्कृती जपणे, वृद्धींगत करणे, संतांच्या विचारांचा प्रसार होणे, आपली प्रेरणास्थळे बळकट करण्यासाठी शासन कार्य करीत आहे. पंढरपूरचा विकास होऊन भव्य कॉरिडॉरची निर्मिती करण्यासाठी नागरिकांना विश्वासात घेण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे. नामदेव महाराजांच्या समाधीस्थळी भव्य स्मारक पंढरपूर येथे उभे रहावे आणि संत नामदेव महाराज मंदिर परिसराचा विकास व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज नामदास व आचार्य तुषार भोसले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी या कार्यक्रमासाठी दिलेला शुभेच्छा संदेश दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नामदेव क्षत्रिय एकसंघचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश ढवळे यांनी केले.या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. समाधान आवताडे, आ. अभिजित पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह निंबाळकर, प्रशांत परिचारक, आचार्य तुषार भोसले, अभिनेता गोविंदजी नामदेव, ह.भ.प. केशव महाराज नामदास, ज्ञानेश्वर महाराज नामदास, आचार्य तुषार भोसले, ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, रुपेश खांडके, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी उपस्थित होते.
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या परिवारातील त्यांचे वंशज हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज नामदास व अन्य संतांचे पद पूजन, संत नामदेव महाराज यांच्या संपूर्ण कार्याची माहिती असलेल्या विशेष संकेतस्थळांचे उद्घाटन, तसेच चांदीच्या विशेष नाण्यांचे विमोचन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.