

HC On divorce case : "हिंदू विवाह कायद्यात लग्न पूर्णपणे तुटणे हा घटस्फोटाचा कारण म्हणून मान्य नाही, तरीही अशा विवाहांत घटस्फोट नाकारणे म्हणजे संबंधित व्यक्तीला सतत वेदना आणि दुःखाकडे ढकलण्यासारखे आहे," असे निरीक्षण मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदवले.
दाम्पत्याचा विवाह २००२मध्ये झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. हुंड्यासाठी पतीने मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप करत पत्नीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. पतीन स्पष्ट केले की, तिने घटस्फोट न घेता दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले आहे. क्रूरतेचे आरोप नाकारात त्यांच्या मुलींचा पत्नीच छळ करत असल्याचा दावा केला.२०२२ मध्ये पत्नी व्यभिचाराचे जीवन जगत असल्याचे स्पष्ट करत कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोट नाकारला.
कौटुंबिक न्यायालयाच्या घटस्फोटास नकार देण्यास आव्हान देणारी याचिका पत्नीने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायाधीश विशाल धागत आणि बीपी शर्मा यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.
खटल्याच्या नोंदी लक्षात घेता, उच्च न्यायालयाने असे आढळून आले की या जोडप्याने यापूर्वी घटस्फोटासाठी संयुक्त याचिका दाखल केली होती, परंतु मतभेद मिटल्यानंतर २०१५ मध्ये ती मागे घेण्यात आली. तथापि, २०१६ मध्ये महिलेला तिच्या घरातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तिने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केले असे नमूद केले. पती आणि पत्नी यांच्यातील विवाह पूर्णपणे तुटला आहे. अपीलकर्त्याच्या चुकीच्या कारणावरून याचिका फेटाळली तर कोणताही उद्देश साध्य होणार नाही.
खंडपीठाने स्पष्ट केले की, या प्रकरणातील महिलेनं पहिलं लग्न अस्तित्वात असताना दुसरं लग्न केलं होतं, हे चुकीचं होतं; पण न्यायालयाच्या मते दुसरं लग्न वैध आहे की नाही. हा मुद्दा त्या खटल्यात महत्वाचा नव्हता. मुख्य प्रश्न असा होता की पतीने पत्नीशी क्रूर वागणूक केली होती का? जर एखाद्या विवाहात पूर्णपणे दुरावा निर्माण झाला असेल आणि तो सुधारण्याची कोणतीही शक्यता नसेल तर घटस्फोट न देणं म्हणजे त्या दोघांना सतत दुख आणि त्रास देण्यासारखं आहे, जेव्हा लग्न पूर्णपणे तुटतं, तेव्हा दोघांनाही मानसिक त्रास होतो, आणि त्यांना त्यांच्या इच्छेनुसार आपलं आयुष्य जगण्याचा किंवा नात्यातून बाहेर पडण्याचा हक्क वापरता येत नाही. जेव्हा एखादं लग्न पूर्णपणे तुटतं, तेव्हा दोन्ही बाजूंना वेदना होतात. तरीही काही वेळा एक पक्ष फक्त दुसऱ्याला त्रास द्यावा म्हणून घटस्फोटाला विरोध करतो आणि हे वर्तनदेखील क्रूरता मानलं जातं."
पती मनाप्रमाणे जीवन जगू देत नव्हता, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने पत्नीला घटस्फोट मंजूर केला.परंतु, न्यायालयाने हेही स्पष्ट केले की या घटस्फोटानंतर महिलेला तिच्या पहिल्या पतीकडून पोटगी किंवा मालमत्तेचा कोणताही हक्क मिळणार नाही.