

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या अडचणी कमी होत नाहीत. एका दिवसात कंपनीचे ७ विमाने उड्डाणे रद्द झाल्यानंतर त्यांच्या विमान सेवेच्या विलंबाचा फटका खासदार सुप्रिया सुळेंनी देखील बसला. दिल्ली ते पुणे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला ३ तासांचा विलंब झाल्याने खासदार सुप्रिया सुळेंनी मंगळवारी (दि.१७) नाराजी व्यक्त केली. एअर इंडियाच्या एआय २९७१ या विमानाने त्या प्रवास करत होत्या. यासंबंधीची माहिती त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन दिली.
या प्रकरणात केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के. राममोहन नायडू यांनी हस्तक्षेप करावा, असे खासदार सुळेंनी म्हटले . यानंतर केंद्रीय मंत्री नायडू यांनी एअर इंडिया आणि विमानतळ अधिकाऱ्यांशी बोलल्याचे सांगितले. सर्व बाधित प्रवाशांच्या अडचणी तातडीने दूर करण्यास सांगण्यात आले आहे, असे केंद्रीय मंत्र्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले.
सुळे यांनी विमानाला ३ तासांपेक्षा जास्त उशीर झाल्याची माहिती त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन दिली. विमानाला विलंब झाला तरीही कर्मचाऱ्यांकडून कोणतीही स्पष्ट सूचना किंवा संभाषण करण्यात आले नाही. प्रवाशांना काही अपडेट दिले नाहीत, मदत केली नाही. कंपनीची सेवा खूप वाईट असल्याचे खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटले.
एअर इंडिया कंपनीकडून अशा प्रकारे विलंब होणे आणि गैरव्यवस्थापन हे सामान्यपणे होतच आहे. प्रवासी अडकलेले आणि असहाय्य आहेत. ही उदासीनता अस्वीकार्य आहे, असे त्यांनी म्हटले. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के. राममोहन नायडू आणि नागरी उड्डयन मंत्रालयाने हस्तक्षेप करून विमान कंपनीला जबाबदार धरण्याची विनंती त्यांनी केली. प्रवाशांना चांगली सेवा मिळाली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, दिल्लीतील खराब हवामानामुळे, विमान सेवांवर परिणाम झाल्याचे एअर इंडियाने दोन तास अगोदर एक्सवर पोस्ट करुन सांगितले. विमानतळावर जाण्यापूर्वी कृपया विमान उड्डाणाबद्दलची माहिती तपासून घ्यावे, असे कंपनीने म्हटले होते.